मुंबई :-भारत आणि इस्रायल यांच्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे संरक्षण संशोधन आणि विकास संचालनालय यांच्यात औद्योगिक संशोधन आणि विकास सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
भारत-इस्त्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या तीन दशकांच्या यशस्वी वाटचालीबाबत बोलताना, इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी इस्रायल आणि भारत यांच्यातील घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंधांवर भर दिला. हे संबंध 2018 मध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीनंतर अधिक दृढ होऊन धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाले आहेत, असे ते म्हणाले. सध्याचे सीएसआयआर आणि इस्रायलचे संरक्षण संशोधन आणि विकास संचालनालय यांच्यातील सहकार्य आणखी मोलाची भर घालेल आणि भारत-इस्रायल संबंधांसाठी मैलाचा दगड ठरेल.
डॉ. एन. कलाईसेल्वी आणि डॉ. डॅनियल गोल्ड यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
सामंजस्य करार विनिर्दिष्ट प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे परस्पर सहमत औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रात औद्योगिक संशोधन आणि विकास कार्यक्रमांमध्ये सहकार्य सक्षम करेल. या सहकार्यामध्ये आरोग्य देखभाल, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणशास्त्र ; स्थापत्य, पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी; रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, ऊर्जा उपकरणांसह शाश्वत ऊर्जा; परिस्थितिकीशास्त्र , पर्यावरण, पृथ्वी व महासागर विज्ञान आणि पाणी; खाणकाम, खनिजे, धातू आणि सामग्री ; कृषी, पोषण आणि जैवतंत्रज्ञान; अशा काही प्रमुख औद्योगिक क्षेत्रांचा समावेश असेल.
मोठी रोगनिवारण क्षमता असलेल्या कोविड-19 औषधाच्या क्लिनिकल चाचण्या घेण्यासंदर्भात सीएसआयआर -भारतीय रासायनिक तंत्रज्ञान संस्था (सीएसआयआर- आयआयसीटी ) आणि मेसर्स 101 थेरपेटिक्स यांच्यात मधील विनिर्दिष्ट सहकार्याची माहिती देण्यात आली. त्या यशस्वी झाल्यास भविष्यात साथीच्या रोगांविरुद्ध ही अत्यंत योग्य आणि प्रभावी सज्जता ठरेल. बैठकीदरम्यान सीएसआयआर-आयआयसीटी आणि मेसर्स 101 थेरपेटिक्स यांच्यातील सामंजस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली.