– युवकाच्या मतदार नोंदीकडे लक्ष वेधा
नागपूर :- नागपूर महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व मतदारसंघांमध्ये युवा मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी नोंदणीसाठी सर्वेक्षण वाढवावे. तसेच शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील तरुण मतदारांची नोंदणी झाली अथवा नाही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे रविवारी महानगर क्षेत्रात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदार क्षेत्रातील जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिशय सक्रियतेने मतदार नोंदणी होत आहे. ग्रामीण भागातील नव मतदार, निधन झालेले मतदार, गाव सोडून गेलेले मतदारांबाबत घरोघरी जाणाऱ्या मतदार नोंदणी निरीक्षकांना तातडीने माहिती उपलब्ध होते. महानगरातही या मोहिमेला प्रतिसाद आणखी मिळणे आवश्यक आहे. त्याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले.
मतदार यादी शुध्दीकरणासाठी मिशन युवा 18 ते 19 वयोगटातील मतदान नोंदणी प्रक्रियेकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयात, बचत भवन येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या समवेत विधानसभा मतदार संघातील 52 नागपूर दक्षिण-पश्चिम, 53 नागपूर-दक्षिण, 54 नागपूर-पूर्व, 55 नागपूर-मध्य, 56 नागपूर-पश्चिम, 57 नागपूर-उत्तर संघनिहाय बैठक घेण्यात आली.
या बैठकीत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रवीण मोहोरे, उपविभागीय अधिकारी नागपूर (शहर) हरिश भामरे, उपजिल्हाधिकारी पूजा पाटील, मतदान नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसिलदार तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व नियुक्त तालुकास्तरावरील समितीतील सर्व सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते.
मिशन युवा अंतर्गत 18 ते 19 वयोगटातील नवमतदार यांचेकडून नमुना नबंर 6 भरुन घेणे, 75 हजार नवमतदार नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करणे, मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांनी बीएलओ ॲपच्या माध्यमातून हाऊस-टू-हाऊस सर्वेचे शंभर टक्के काम पूर्ण करणे,तसेच निधन झालेले मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदार, दुबार मतदार यांच्याबाबतीत नाव वगळण्याकरीता नमुना ७ भरुन घेणे, मतदारांच्या नाव, वय, पत्ता, फोटो यातील दुरुस्त्यासाठी नमुना ८ भरुन घेणे, मतदार कार्डशी आधारकार्ड नंबर जोडणीकरिता नमुना 6 ब भरुन घेणे, यातील कार्यवाही ही बीएलओ ॲपच्या माध्यमातून तातडीने शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या.
सदर बैठकीच्या वेळेस संबंधित विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी व नागपूर शहरी भागासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय व उपजिल्हा निवडणूक अधिकारी हे स्वतः उपस्थित होते व ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघांच्या बैठकीच्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित होत्या.