– विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण
नागपूर :- राह फाऊंडेशनद्वारे तरुण तरुणींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देणारे ‘समर्थ’ प्रशिक्षण केंद्र नागपुरात सुरू करण्यात आले आहे. शहरातील झाशी राणी चौकातील गोपालकृष्ण भवन स्थित स्पेक्ट्रम ॲकेडमी येथे या प्रशिक्षण केंद्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्या हस्ते बुधवारी (ता.२३) उद्घाटन झाले. याप्रसंगी स्पेक्ट्रम ॲकेडमीचे सुनील पाटील, राह फाऊंडेशनच्या विद्या राय, डॉ. सारिका कुलकर्णी आदी उपस्थित होते.
राह फाऊंडेशनच्या तरुण तरुणींना रोजगाराची वाट दाखविणा-या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सोशल एम्पॉवरमेंट बाय एंजेल वनचे सहकार्य लाभले आहे. प्रकल्पाचे नॉलेज पार्टनर उन्नती बंगळुरू तर इंम्प्लिमेंटेशन पार्टनर वर्शिप अर्थ फाऊंडेशन आणि स्पेक्ट्रम ॲकेडमी हे आहेत.
राह फाऊंडेशनद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील १८ ते २५ वयोगटातील युवक आणि युवतींना ३५ दिवस पूर्णवेळ रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाते. फाऊंडेशनद्वारे मुंबई, रायगड येथील पेण आणि बडोदा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. नागपूर येथील केंद्राला सुरूवात झालेली असून लवकरच नाशिक येथेही प्रशिक्षण केंद्राची सुरूवात केली जाणार आहे. प्रशिक्षण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, जीएसटी/टॅलिकम्प्युटर प्रशिक्षण, जीवन कौशल्य आणि मूल्य, संवाद कला, इंग्रजी बोलणे या प्रमुख घटकांचे प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे प्रशिक्षण वर्गात विद्यार्थ्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीमध्ये पूर्णत: तंत्रज्ञानाधारित शिक्षण दिले जाते. पाठ्यपुस्तक विरहित जास्तीत जास्त प्रत्यक्ष सहभागातून प्रशिक्षण देउन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षित करणे हे प्रकल्पाचे वैशिष्ट्ये आहे. ३५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राह फाऊंडेशन आणि सहकारी सर्व संस्थांच्या मदतीने स्थानिक शहरामध्येच मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. नोकरीवर रूजू झाल्यास संबंधित प्रशिक्षणकर्त्याला पुढील ६ महिने कामात येणा-या अडचणी तसेच अन्य अडथळे दूर करण्याबाबत देखील फाऊंडेशनद्वारे मदत केली जाते.
राह फाऊंडेशन आणि सहयोगी संस्था सोशल एम्पॉवरमेंट बाय एंजेल वन, उन्नती बंगळुरू, वर्शिप अर्थ फाऊंडेशन आणि स्पेक्ट्रम ॲकेडमी या सर्वांचे उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी अभिनंदन करीत प्रकल्पाचे कौतुक केले. आजच्या विद्यार्थ्यांना योग्य वेळेत योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्या पुढील प्रवासाला योग्य दिशा मिळू शकते. रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणासह तरुण आणि तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि पुढे नोकरीतील अडचणी देखील दूर करणे ही अत्यंत स्तूत्य संकल्पना असून अशा प्रशिक्षण प्रकल्पाची शहराला गरज असल्याचे देखील मत जोशी यांनी व्यक्त केले.