नागपूर :- विधानभवन इमारतीवर नव्याने तयार करण्यात आलेल्या कायमस्वरूपी विद्युत रोषणाई प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी येथील विधानभवन परिसरात भेट देवून सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विधानभवन इमारतीच्या दर्शनी भागात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व सजावटीची पाहणी केली. विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार प्रवीण दटके व कृष्णा खोपडे यावेळी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विदर्भाला न्याय देण्यासाठी नागपूरच्या विधानसभा इमारतीचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. 1912 ते 914 या कालावधीत पूर्ण करण्यात आलेल्या या इमारतीत 1920 मध्ये भारतातील लोकांना प्रतिनिधीत्वाचा अधिकार देण्यासाठी विधानपरिषदेच्या सदस्याची पहिली सभा तसेच 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्रातील पहिले अधिवेशन याच इमारतीत झाल्याचे त्यांनी सांगितले. कायमस्वरूपी विद्युत रोषणाईच्या माध्यमातून या सुंदर इमारतीचे सौंदर्य अधिकच वाढले आहे. नागपूरप्रमाणेच मुंबईच्या विधानभवनात देखील अशीच आकर्षित रोषणाई करू असे त्यांनी सांगितले. नागपूर विधानभवन इमारतीच्या विस्तारीकरणासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात आला असून लवकरच नवीन विधानसभेची विस्तारीत इमारत दिसून येईल, असेही ते म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विविध रंगछटेच्या विद्युत रोषणाईसाठी जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून एक कोटी सात लक्ष रूपयात हे काम पुर्ण करण्यात आले आहे. यात आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला असून विशिष्ट प्रणालीद्वारे या रंगछटा देशाच्या कोणत्याही भागातून नियंत्रीत करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचे काम पूर्ण करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.
विधानभवन परिसरात रोषणाईमुळे उजळून निघालेला परिसर पाहण्यासाठी नागरिकांनाही मोठ्या संख्येने गर्दी केली होती.