पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासस’ नंगारा म्युझियमचे शनिवारी लोकार्पण

– पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवी येणार

यवतमाळ :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होत आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच पोहरादेवीत येत असल्याने या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री, खासदार, आमदार , विविध राज्यातील बंजारा लोकप्रतिनिधी, समाजातील महंत आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत. येथे पोहोचल्यानंतर ते जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. तसेच बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमानंतर आयोजित मुख्य सभेत जनतेला संबोधित करतील. 

पोहरादेवी (ता. मानोरा) बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. देशभरातील १० कोटी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी, धर्मगुरू रामरावबापू महाराजांची समाधी आणि जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकास देशभरातील बंजारा समाजाचे संपूर्ण दर्शन व्हावे या दृष्टीकोनातून लोकनेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नाने पोहरादेवी विकास आराखड्यांतर्गत येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नंगारा वास्तुसंग्रहालय साकारण्यात आले आहे. २०१८ मध्ये या वास्तुसंग्रहालायाचे भूमिपूजन झाले होते. आज जागतिक दर्जाचे असे हे संग्रहालय तयार झाले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन बंजारा समन्वय समितीने केले आहे.

जागतिक दर्जाचे वास्तुसंग्रहालय

१६ एकर परिसरात पारंपरिक आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळ घालून उभारलेले नंगारा वास्तू संग्रहालय पाच मजली आहे. त्यात १३ विविध गॅलरी असून येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन होणार आहे. याशिवाय फ्लाईंग थिएटर, मुव्हिंग प्लॅटफॉर्म, रमलिंग प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध सात भाषांमध्ये येथील माहिती व बंजारा समाजाचा इतिहास प्रेक्षकांना समजून घेता येणार आहे. नंगारावर भव्य अशी १६० फूट बाय ३० फूट एलईडी स्क्रीन लावण्यात आली असून अर्धा किमी अंतरावरूनही स्क्रीनवरील दृश्य बघाता येणार आहे. १५० फूट उंच सेवाध्वज, संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. येथे दररोज सायंकाळी ७ वाजतापासून लेझरसहित लाईट आणि साऊंड शो होणार आहे. हे संग्रहालय बघायला जवळपास ९० मिनिटे लागतात. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमूना असलेले हे देशातील एकमेव असे आगळे वेगळे संग्रहालय आहे. हे संग्रहालय बघताना प्रेक्षकांना वेगळी अनुभूती मिळणार आहे. शनिवारी ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी २ वाजतापासून निमंत्रितांना हे संग्रहालय बघण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर दररोज हे संग्रहालय पर्यटकांना बघता येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहरातील महत्वाच्या दोन प्रकल्पांचे पंतप्रधान यांच्या हस्ते उदघाटन

Thu Oct 3 , 2024
– रामाळा तलाव पुनर्जिवीकरण प्रकल्पाचे भूमिपुजन व सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी उदघाटन   – भविष्याची गरज लक्षात घेता पाण्याचा दुसरा स्रोत निर्माण करणे आवश्यक – आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर :- भारत देशाला सुंदर स्वच्छ बनवायचे असेल तर प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. स्वच्छता हीच सेवा आहे, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या वर्षीची थीम असून स्वच्छता संपन्नतेचा महामार्ग आहे, स्वच्छता सहज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com