गोरेगाव येथे एसीटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- “मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “आर्किटेक्चर, कन्स्ट्रकशन, इंजिनिअरिंग” या विषयावर गोरेगाव येथे आयोजित एसटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, तसेच बांधकाम क्षेत्रातील मनीष गांधी, एसीटेक प्रदर्शनाचे संचालक सुमित गांधी, निरंजन हिरानंदानी, हफिज काँट्रॅक्टर, विकास ओबेरॉय, संदीप रुणवाल, आशिष रहेजा, हॅन्सग्रॉव्ह कंपनीचे ख्रिस्तोफी गोरलॅन, पाओलो रोमानी आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील काही दालनांना भेट देऊन पाहणी केली. या प्रदर्शनात एकंदर 500 दालने आहेत अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली. 

प्रकल्प वेळेत पूर्ण करणार

“शासन अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गेल्या तीन महिन्यांत शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे शासन समर्पित भावनेने सक्रीय आहे. महाराष्ट्राला भारतातील सर्वात विकसित राज्य बनवायचे आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे” असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.

आधुनिक भारताचे रचनाकार

आशियातील सर्वात भव्य प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री म्हणाले की, नवीन भारताचे चित्र प्रदर्शनातून साकारले जाईल. बिल्डर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. आधुनिक भारताचे विकासक आहेत.

महाराष्ट्र हे मॅग्नेट

या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचाही समावेश आहे. आजही मुंबई आणि महाराष्ट्र हे जागतिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करणारे मॅग्नेट आहे. आज महाराष्ट्रात मोठ्या पायाभूत सुविधांची कामे सुरू होत आहेत. हे ब्रँड केवळ व्यवसायासाठी येत नाहीत. त्यांच्या जागतिक दर्जाच्या कामांना व्यापक प्रतिसाद इथे मिळते. राज्य सरकारच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रिअल इस्टेट हे शेतीनंतरचे दुसऱ्या क्रमांकावरील क्षेत्र आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. त्यामुळेच या क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सुविधा दिल्या आहेत. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची राज्य शासनाची पंचसूत्री आहे.

केंद्राच्या मार्गदर्शनामुळे वेगाने प्रगती

काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली आहे की, महाराष्ट्रात 2 लाख कोटींचे 225 हून अधिक प्रकल्प मंजूर झाले आहेत. केंद्र सरकारचा राज्य शासनाला त्यासाठी पूर्ण पाठिंबा असेल असे सांगितले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना नंतर प्रथमच महाराष्ट्र सर्व बंधनातून मुक्त होऊन वेगाने घोडदौड करीत आहे. लोकं उत्साहात आहेत. उत्सव देखील साजरे झाले आहेत. एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.

नरीमन पॉइंट ते रायगड वीस मिनिटांत

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती दिली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम 84 टक्के पूर्ण झाले असून नरीमन पॉईंटहून वीस मिनिटांत रायगड जिल्ह्यात पोहोचता येणार आहे. रायगड जिल्ह्यातही ग्रोथ सेंटर बांधण्यात येणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. पायाभूत सोयी-सुविधा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन भरीव काम करीत आहे, असे ते म्हणाले.

एमएमआरडीएचे एक लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प

एमएमआरडीएचे एक लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प निर्माणाधीन आहेत. दरवर्षी 25 हजार कोटींची कामे होतील, अशी योजना तयार करण्यात आली आहे.

पुढील 20 वर्षांसाठी एमएमआर प्रादेशिक योजना आणि एमएमआर वाहतूक योजना तयार केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने एमएमआरडीए ला 60 हजार कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या गेम चेंजर प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार असून, हा महामार्ग दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड कॉरिडॉर, जेएनपीटीशी जोडला जाईल असेही ते म्हणाले.

आता मुंबई ही बदलणार

आता मुंबईचे रूपही बदलणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील दोन अडीच वर्षात मुंबईतील रस्ते पूर्णपणे काँक्रिटचे करण्यात येतील, रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त असतील आणि रस्त्यांमध्ये पाणी तुंबणार नाही, असे सांगितले.

आयकॉनिक इमारती उभारण्यात आल्या पाहिजेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा इतिहास आणि वैभव देखील जपण्यात येईल असे सांगितले.

5000 किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते

राज्यात 5000 किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते तयार करण्यात येणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामाचा डीपीआर तयार झाला आहे. तसेच क्लस्टर विकासाला गती देण्यात येत आहे, मुंबई झोपडीमुक्त करणार असल्याचे सांगितले.

प्रीमियम, मुद्रांक कर, युनिफाईड विकास नियंत्रण नियमावली या माध्यमातून विकासकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन यांनी आपल्या भाषणात “येत्या दोन वर्षात मुंबईत कुठूनही कुठे केवळ एक तासाच्या आत नेणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत”, असे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरसी कलारिया यांचा मेक इन इंडिया आणि कौशल्य विकासातील कार्यासाठी सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रंथप्रेमींसाठी 16 नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’

Thu Nov 10 , 2022
मुंबई :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ येत्या 16 व 17 नोव्हेंबर रोजी दादर (पू) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण व मराठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com