– राजकीय पक्षानी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा
नागपूर :- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांमध्ये झालेला बदल नजरेखालून घालण्यासाठी मंगळवार पर्यंतची मुदत मान्यता प्राप्त राजकीय पक्षासाठी ठेवण्यात आली आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षानी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विभागात २६ सप्टेंबर पर्यंत आपले आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघामध्ये काही मतदान केंद्र बदलले आहेत. काहींच्या नावांमध्ये बदल झाले आहेत. काही मतदान केंद्रातील मतदार दुसऱ्या मतदान केंद्रात टाकण्यात आले आहे. तर काहींच्या पत्त्यामध्ये बदल झाला आहे. या बदलाची माहिती मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाना व्हावी यासाठी २६ सप्टेंबर पर्यंत बदललेले प्रारूप अवलोकनार्थ उपलब्ध करण्यात आले आहे.
मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या ही १५०० निर्धारित असते. अशा पद्धतीची संख्या वाढल्यानंतर वाढलेले मतदार लक्षात घेऊन नव्या केंद्राची निर्मिती होते. किंवा इमारत जीर्ण झाल्यानंतर ते केंद्र बदलविले जाते.जिल्ह्यामध्ये १४ नवीन मतदान केंद्र तयार झाले आहेत. तसेच एखाद्या मतदार केंद्रामध्ये १५०० पेक्षा अधिक मतदार झाल्यामुळे केंद्रातील काही मतदार जवळच्या मतदान केंद्रावरील मतदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. असे (मर्ज ) झालेल्या मतदान केंद्राची संख्या जिल्ह्यामध्ये 20 आहे. काही कारणास्तव पूर्वीच्या मतदान केंद्राची जागा बदलविण्यात आलेल्या मतदान केंद्राची जागा जिल्ह्यामध्ये 68 आहे तर अनेक मतदान केंद्राचे नाव वेगवेगळ्या कारणास्तव बदलण्यात आले आहे. स्थळ तेच असले तरी नावामध्ये बदल झाला आहे. काही शाळांचे नाव बदलले आहे. काही शाळांचे श्रेणी वर्धन झाले आहे. अशा पद्धतीच्या नावाच्या बदलाची संख्या 278 आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या संदर्भातील असे एकूण 380 बदल आहेत. या बदला संदर्भात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची हरकत असेल, आक्षेप असेल तर निवडणूक विभागाने त्यांना ही संधी उपलब्ध केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी केले आहे.