नागपूर – नागपूर महानगरपालिकेमध्ये गाजत असलेल्या स्टेशनरी घोटाळ्याच्या विषयावरून नगरसेवक व भाजपाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.
४१ बिलांवरून ६७ लक्ष रुपये संबंधित कंत्राटदारांना अदा करण्यात आल्याच्या प्रकरणामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्याद्वारे तक्रार नोंदविण्यात आली. या संपूर्ण प्रकरणातील कंत्राटदाराद्वारे वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांद्वारे मनपात कंत्राट मिळविल्याचे पुढे आले. ४० वर्षापासून एकाच परिवारातील सदस्यांनी वेगवेगळ्या पाच एजन्सींना नोंदणीकृत करण्यात आले आहे. मनपामध्ये या एजन्सींची सहानिशा न करता नोंदणी करणारे अधिकारी देखील यामध्ये दोषी असल्याचे मत ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी मांडले.
संपूर्ण घोटाळ्यासंदर्भात मनपा आयुक्तांद्वारे अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र आयुक्तांना समिती गठीत करण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत आयुक्तांना कोणत्या अधिकारात किंवा कोणत्या नियमांतर्गत चौकशी समिती तयार करण्याचा अधिकार आहे, असेही त्यांनी विचारले. तसा अधिकार जर नसेल तर ही समिती बरखास्त करणार का? असा सवालही त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणात सामान्य प्रशासन विभागावरही त्यांनी ताशेरे ओढले. स्टेशनरी हा विषय सामान्य प्रशासन विभागांतर्गत आहे. या विभागाच्या प्रमुखाच्या स्वाक्षरी शिवाय कोणतेही बिल मंजुर केले जात नाही. या प्रकरणात सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुखांच्या स्वाक्षरीशिवाय हे बिल मंजुर करण्यात आले का आणि असे असेल तर मग सामान्य प्रशासन विभाग दोषी का नाही का? असाही प्रश्न त्यांनी मांडला. स्टेशनरी प्रकरणातील बिल अदा करताना ज्या अधिका-यांच्या सह्या आहेत, त्यांची नावे सभागृहापुढे सांगण्याची मागणीही त्यांनी केली व त्या अधिका-यांवर दोषारोप लावण्यात आले आहेत का, याची विचारणाही केली.
स्टेशनरी घोटाळा प्रकरणात सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्या संगणकावरून देयक मंजुर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्या यूजर आयडी आणि पासवर्डचा वापर करण्यात आला. प्रशासनाद्वारे श्री. धामेचा यांचे यूजर आयडी आणि पासवर्ड चोरी झाल्याची माहिती देण्यात आली. यावर श्री. महेश धामेचा यांचा यूजर आयडी, पासवर्ड चोरी होउ शकतो का? असाही प्रश्न ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी उपस्थित केला.
-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com