राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत डॉ. पंकृवि विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारोह संपन्न

– डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कार्य उल्लेखनीय : राज्यपाल रमेश बैस

– शेतकऱ्यांना वातावरण बदलांमुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम करण्याची राज्यपालांची सूचना

मुंबई  :-आपल्या स्थापनेच्या ५५ वर्षांमध्ये डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. वाढती लोकसंख्या, सातत्याने कमी होत असलेले कृषिक्षेत्र व हवामानातील तीव्र बदल या पार्श्वभूमीवर कृषि विद्यापीठांना आगामी काळातील आव्हानांसाठी तयार राहावे लागेल तसेच वातावरण बदलांमुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केले.

राज्यपाल बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत बुधवारी (दि. १४) अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ संपन्न संपन्न झाला, त्यावेळी राजभवन येथून स्नातकांना संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

भारताकडे शेती करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आहे व लोकांना पारंपरिक शेतीचे ज्ञान आहे. या क्षमतांचा वापर करुन कृषि स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनवावे व त्याहीपुढे जाऊन देशाला जगासाठी ‘अन्नधान्याचे कोठार’ बनवावे असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या दहा वर्षात देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, त्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी, कृषि शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयन्त झाले आहेत असे सांगून राज्यात फलोत्पादन व फुलशेती उद्योगाला तसेच अन्नप्रक्रिया क्षेत्रात स्टार्टअप्स सुरु करण्यास बराच वाव असल्याचे राज्यपाल बैस यांनी सांगितले.

वाढती लोकसंख्या व औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर जल व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल तसेच मृदा गुणवत्ता सुधार व उत्तम बीजनिर्मिती याकडे देखील लक्ष्य द्यावे लागेल असे राज्यपालांनी सांगितले.

कृषी वैज्ञानिक डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या द्रष्टेपणामुळे भारत अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला असे सांगून कृषि स्नातक व कृषि वैज्ञानिकांनी वातावरण बदलाच्या येऊ घातलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री व विद्यापीठाचे प्रकुलपती धनंजय मुंडे यांनी दृक्श्राव्य माध्यमातून संबोधित करताना केले.

कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे कृषि क्षेत्राचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे कृषि स्नातकांनी कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचे अध्ययन करावे व आपल्या ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना करून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

पंकृवि विद्यापीठ परिसरात झालेल्या दीक्षांत समारोहाला गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ झेड पी पटेल, पंकृविचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, राज्यातील कृषि व माफसू विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठाचे माजी कुलगुरु, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक तसेच स्नातक उपस्थित होते. यावेळी ४०४० स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तर ७९ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके तसेच रोख पारितोषिके देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बहुजन जुडेगा.. देश बढेगा ! - लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी १६ फेब्रुवारीला राकाँ शरद पवार गटाची बाईक रॅली

Thu Feb 15 , 2024
भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश तर्फे महाराष्ट्रातील सर्व बहुजनांना संघटित करण्याच्या उद्देशाने येत्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी महा बाईक रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर रॅली महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातून ७२ विधानसभा क्षेत्रामध्ये २५०० किमी प्रवास करणार आहे. सदर रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून, जितेंद्र आव्हाण, रोहित पवार व राज राजापूरकर आदी मान्यवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com