भंडारा : राज्यस्तरीय भाषा सल्लागार समितीमध्ये जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची नियुक्ती झाली आहे. तसा शासन निर्णय आज प्रसिध्द झाला आहे. राज्याचे साधारणपणे पुढील 25 वर्षाचे धोरण ठरविणे, भाषा अभिवृध्दीसाठी नवनवे उपाय व कार्यक्रम सुचविणे व या अनुषंगाने शासनाला मार्गदर्शन करणे. भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या अनेक कोशांमध्ये नवीन प्रचलित शब्दांची भर घालून कोश अद्ययावत करणे, नवीन परिभाषा कोशांची निर्मिती करणे, परिभाषा कोशांचे पुनर्मुद्रण, परिभाषेतील अत्यावश्यक परिष्करणे, शब्दव्युत्पती, मराठी परिभाषिक संज्ञांच्या समस्या सोडविणे यासारखी कामे पार पाडण्यासाठी भाषा सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा थोडक्यात परिचय : भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार (कोहळी) येथील रहिवासी असलेल्या डॉ. बोरकर यांनी नागपूर विद्यापिठातून पीएच डी. केलेली आहे. त्यांचे विविध विषयांवरील 105 ग्रंथ प्रकाशित आहेत तर विविध विषयावरील 16 ग्रंथांचे संपादन सुध्दा त्यांनी केले आहे. अनेक दैनिकांमध्ये विविध विषयांवर लेखनमाला प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणी व दुरदर्शनवर मुलाखती, भाषणे, गाणी, संगीत यासारखे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. महाराष्ट्र शासनाचा ना. गो. कालेलकर भाषाशास्त्र व व्याकरण पुरस्कार, पौढ विभागातील जयवंत दळवी एकांकिका पुरस्कार यांचेसह जवळपास 36 साहित्यिक पुरस्कार डॉ. बोरकर यांना मिळाले आहे.
उल्लेखनिय कार्य : शिक्षण क्षेत्रात शुध्दलेखन ऐवजी प्रमाणलेखन या पर्यायाचा प्रथम वापर, झाडीबोली साहित्य चळवळीचे आद्य प्रर्वतक, दंडार लोकनाट्याचा सर्वप्रथम नाटकात वापर यासह अनेक उल्लेखनिय कार्य त्यांनी केले आहेत.