सर्वांना योग्य वितरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
नागपूर,दि.17 : जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघु व सूक्ष्म पाणीसाठ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे नियोजित आरक्षणाप्रमाणे सर्वांना पाणी पुरवठा करण्यात यावा, मात्र निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता पुढील वर्षांसाठी देखील साठा नियोजित करुन ठेवण्यात यावा, अशी सूचना राज्याचे उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पाणी आरक्षण सभेची बैठक घेण्यात आली. यावर्षी जिल्ह्यामध्ये प्रकल्पातून पिण्याचे पाणी तसेच औद्योगिक वापरसाठी लागणारे पाणी देण्याची क्षमता प्रकल्पांमध्ये आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात वितरण करण्याचे त्यांनी आढावा बैठकीनंतर सांगितले.
आजच्या बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, आमदार राजू पारवे, आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध प्रकल्पाबद्दलचा आढावा घेण्यात आला. प्रामुख्याने पेंच प्रकल्प, निम्न वेणा, जाम, कोलार, चंद्रभागा, सावनेर इत्यादी मध्यम प्रकल्प नाणी, तुरागोंदी आदी प्रकल्पाबाबतही आढावा घेण्यात आला. सन 2020-21 पाणी आरक्षण सभेचे अनुपालन या सभेमध्ये नागपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. ढुमणे यांनी सादर केले.
सर्व प्रकल्पामध्ये यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे आरक्षण पाळणे शक्य असल्याचे प्रतिपादन अभियंत्यांने केले. यावेळी पाणी वाटपासंदर्भातील सध्यास्थिती व मागणी यावरही चर्चा करण्यात आली. पिण्याच्या पाण्याला पुरवतांना कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.