नागपूर :- ग्रामायण सेवा प्रदर्शन हा विदर्भातील ग्रामीण भागातील लोकांसाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम ठरला आहे. या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध सेवा आणि उत्पादने उपलब्ध होतात. या प्रदर्शनाने विदर्भातील लोकांमध्ये भारतीय संस्कृती पुन्हा रुजविण्यास आणि जागरूकता निर्माण करण्यात मदत केली आहे. ग्रामायण सेवा प्रदर्शन आता सर्वदूर पोहोचावे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली.
ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने रामनगर मैदान रामनगर येथे आयोजित ग्रामायण सेवा प्रदर्शनाचा समारोप मंगळवार, २६ डिसेंबर २०२३ रोजी रामनगर मैदान येथे सायंकाळी झाला. या सोहळ्याला केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे डायरेक्टर पी. एम. पार्लेवार, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन, नागपूरचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता आणि प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट, अंकुर सीड्स (फायनान्स) दिलीप रोडी प्रमुख, विकल्प संस्थेचे प्रकाश गांधी, नॅशनल युथ अँड चाईल्ड डेव्हलपमेंटचे राजेंद्र मालवीय, वायगाव हळद पेटंट मिळविणाऱ्या शोभाताई गायधनी, माजी नगरसेविका परिनीता फुके, पश्चिम नागपूर नागरिक मंडळाचे रवी वाघमारे, ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे, सचिव संजय सराफ यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनात सहभागी संस्था, प्रतिनिधी, स्टालधारक, आयोजन समिती सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात ग्रामीण भागातील शेतकरी, उद्योजक, उत्पादक, तंत्रज्ञान, सरकारी यंत्रणा, बँका, महिला विद्यापीठ आणि इतर संबंधित संस्थांचा सहभाग होता. या प्रदर्शनामध्ये बांबूपासून निर्मित साहित्य, लोणचे, पापड, नाचणीचे पदार्थ, स्वेटर, बॅग, मातीची भांडी, ज्वेलरी, हर्बल पेस्ट, गुड, ड्रायफूड, मसाला पावडर, खादीचे कपडे, महिलांचे साहित्य, घरगुती वापराच्या वस्तू, आयुर्वेदिक वनस्पती, औषधी, आयुर्वेदिक मेडिसिन प्लांट आदींचे स्टॉल्स आणि प्रदर्शने लावण्यात आली होती.
उत्पादनांची मार्केटिंग व्हावी : पी. एम. पार्लेवार
केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे डायरेक्टर मा. श्री पी. एम. पार्लेवार म्हणाले, ग्रामीण उद्योग हे आपल्या देशाचे गौरव आहे. या क्षेत्रात खूप मोठी क्षमता आहे. या क्षमताचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.आपल्या जुगाड आणि नवनवीन उत्पादनांबद्दल मी खूपच प्रभावित झालो आहे. या प्रदर्शनात बांबूचे अनेक नवीन आणि आकर्षक उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनांना अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्पादनांना आकर्षक आणि सुलभतेने दिसणाऱ्या डोममध्ये किंवा पार्टिशनमध्ये ठेवले पाहिजे. यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाईल आणि ते उत्पादनांना पाहण्यासाठी प्रेरित होतील. उत्पादनांचे मार्केटिंग करून उत्पादनांबद्दल माहिती दिली पाहिजे. कौशल्य विकास, मार्केटिंग आणि नवकल्पना यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये मदत करण्यासाठी अनेक योजना आहेत.
ग्रामीण प्रतिभावंताना वाव मिळावे : दिलीप रोडी
प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट, अंकुर सीड्स (फायनान्स) दिलीप रोडी म्हणाले, आजच्या जगामध्ये कोणत्याही गोष्टीचे चांगले प्रेझेंटेशन महत्त्वाचे आहे. आपल्याकडे ग्रामीण भागातही अनेक प्रतिभावान लोक आहेत. या प्रतिभाला वाव मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त लोक कसे आणता येतील याचा विचार केला पाहिजे. शहरातील लोकांनाही या प्रदर्शनात रस वाटेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जास्तीत जास्त लोक या प्रदर्शनाला कसे आणता येईल यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केले.
शेतकऱ्यांचा फायदा होईल : डॉ. दिलीप गुप्ता
स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन, नागपूरचे अध्यक्ष मा. डॉ. दिलीपजी गुप्ता म्हणाले, या सगळ्या उपक्रमामध्ये सगळे जे कलाकार सापडले आहेत, त्यांच्या वस्तू अतिशय सुंदर आहेत. शेतकऱ्यांचा फायदा होईल, याच्यासाठी अनेक प्रयत्न लोक करतात. शेतकऱ्यांचा माल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामायणने नागपूरसारखा कार्यक्रम विविध ठिकाणी घ्यावा, अशी अपॆक्षा व्यक्त केली.
जुगाडू इंजिनिर्स स्पर्धा
ग्रामायण प्रतिष्ठान जुगाडू इंजिनिर्स स्पर्धा २०२३ दुसऱ्या वर्षी पण आयोजित करण्यात आली होती. समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सर्जनशील जुगाडू इंजिनिर्सचा शोध घेत उत्कृष्ट ठरलेल्या संशोधक विद्यार्थी आणि तरुणांचा सत्कार यावेळी करण्यात आला. अश्विनी बुजोणे यांनी जुगाडू पुरस्कार वितरणचे संचालन केले.
एटीएल लॅब विदर्भाचे प्रमुख अरविंद लोंढे यांनी नागपुरातील शाळांच्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक उत्पादनांची माहिती दिली आणि पुढील वर्षी अधिक शाळा यात सहभागी होतील असे सांगितले.
अनुराधा सांबरे यांनी महिला कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला. विलास खनगन यांनी ग्रामायण सिनिअर्स फोरमच्या कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला.
राजेंद्र काळे यांनी प्रदर्शनात उभारणीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला. प्रशांत बुजोणे यांनी स्टॉल धारकांचे आभार मानले. श्रावणी बुजोणे हिच्या ग्रामायण गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. काटे यांनी स्वागत गीत म्हटले. कार्यक्रम सूत्र संचालन नरेंद्र गिरीधर यांनी तर आभार मिलिंद गिरीपुंजे यांनी मानले