अमरावती :- जीवनात बरेचदा आपण गैरसमजांनाच सत्य मानून जगत असतो. त्यांचाच प्रसार-प्रचारही करीत असतो. सामाजिक पातळीवर विचार करता अनेक गैरसमज हे विषमतेची निर्मिती आणि पोषण करणारे असतात. समाजात दिसून येणारी लैंगिक असमानतासुद्धा अशाच काही गैरसमाजांवर आधारित आहे. करिता समानता प्रस्थापित करण्यासाठी गैरसमजांच्या पलीकडे जाणे आवश्यक ठरते. त्यासाठी ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाविषयी प्रचलित असणाऱ्या गैरसमजांची चिकित्सा करून त्यांच्या प्रतिष्ठापूर्ण जगण्याच्या अधिकाराला अवकाश उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने हा परिसंवाद अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी व्यक्त केले.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा डॉ. जे. जी. देशमुख सभागृहात ‘लिंगभाव संवेदनशीलता आणि एलजीबीटीक्यूआयए+’ या विषयावर आयोजित एकदिवसीय परिसंवादात त्यांनी आपली अध्यक्षीय भूमिका मांडली. यावेळी विचारमंचावर चर्चक म्हणून ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अंबादास मोहिते आणि अमरावती येथील समर्पण ट्रस्टच्या संचालक हेमंत कुमार टोकशा यांसह वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे उपस्थित होत्या.
‘एलजीबीटीक्यूआयए+’ चा अर्थ
कार्यक्रमा दरम्यान ‘एलजीबीटीक्यूआयए+’ म्हणजे काय, हे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार एलजीबीटीक्यूआयए+ मधील ‘एल’ म्हणजे लेस्बियन, ज्यात एखादी स्त्री स्त्रीकडे आकर्षित होते.’जी’ म्हणजे गे ज्यात एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतो. ‘बी’ म्हणजे बायसेक्शुअल, यात एखादा पुरुष किंवा स्त्री ही स्त्री आणि पुरुष दोघांकडेही आकर्षित होते. ‘टी’ म्हणजे ट्रान्सजेंडर, जेव्हा एखाद्याचे शरीर पुरुषाचे असते, मात्र त्याच्या भावना स्त्रीच्या असतात किंवा जेव्हा एखाद्याचे शरीर स्त्रीचे असते, परंतु भावना पुरुषाच्या असतात, अशा व्यक्तींना ट्रान्सजेंडर म्हणून ओळखल्या जाते. जन्मत: प्राप्त झालेल्या लिंगापासून भिन्न भावनांमुळे हे घडते. अशा वेळी काही जण शस्त्रक्रिया करून लिंगबदल करतात. ‘क्यू’ म्हणजे क्विअर. यामध्ये अशा व्यक्तींचा समावेश होतो, की ज्यांना आपल्या ओळखीबद्दल आणि शारीरिक इच्छेबद्दल संभ्रम असतात. क्विअर मधल्या ‘क्यू’चा अर्थ प्रश्नार्थक असा देखील केला जातो. ‘आय’ म्हणजे इंटरसेक्स या श्रेणीत येणारे लोक शारीरिक लैंगिक अवयवाद्वारे पुरुषही नसतात किंवा स्त्रीसुद्धा नसतात. ‘ए’ म्हणजे असेक्शुअल किंवा अलाय होय. असेक्शुअल म्हणजे अलैंगिक होय. ज्यांना कोणत्याही लिंगाबद्दल लैंगिक आकर्षण वाटत नाही. तर ‘अलाय’ म्हणजे एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाचे सहकारी होय. त्यांच्या हक्कांसाठी बोलणाऱ्या व्यक्तींसाठी हा शब्द वापरण्यात येतो. ‘प्लस’ यामध्ये पॅनसेक्शुअल, पॉलीमोरस, डेमिसेक्शुअल यांसह इतर अनेक गटांचा समावेश आहे. अद्याप ज्या गटांची ओळख निर्माण झालेली नाही, अशा गटांसाठी हे चिन्ह ठेवण्यात आलं आहे.