नागपूर: देशातील अत्यंत जुन्या व नावाजलेल्या नागपूर फ्लाईंग क्लब लवकरात लवकर सुरु करुन मध्य भारतासह विदर्भातील वैमानिक प्रशिक्षणाला लवकर सुरु करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे व न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी दिल्या.
नागपूर फ्लाईंग क्लबला गौरवशाली इतिहास असून या क्लबने देशाला बरेच पायलट दिले आहेत. उड्डाण क्षेत्रातील करिअरच्या संधी लक्षात घेऊन फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षणाला लवकरच सुरुवात करण्यात येत असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष्ा श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.
नागपूर फ्लाईंग क्लब येथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार फ्लाईंग क्लब सुरु करण्यासंदर्भात न्यायमूर्तींनी आज सोनेगाव विमानतळ परिसरात असलेल्या फ्लाईंग क्लबला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. फ्लाईंग क्लबकडे असलेल्या चार विमाने प्रशिक्षणासाठी सज्ज आहेत. सेसना 172 या विमानाच्या ग्राऊंड रनमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच विमानाचे आतून निरीक्षण, देखभाल व दुरुस्तीची माहिती घेतली. नागपूर फ्लाईंग क्लब सुरु करण्यासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या कामकाजाची सादरीकरणाद्वारे माहिती घेतली.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे व न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी संपूर्ण हँगरची माहिती घेताना वैमानिक प्रशिक्षण सुरु करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. वैमानिक प्रशिक्षणासाठी युवकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरु करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी यावेळी दिली.
नागपूर फ्लाईंग क्लब सुरु करण्याबाबत येथील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल न्यायमूर्तींनी समाधान व्यक्त करुन अभिनंदन केले. तसेच क्लबच्या भविष्यातील योजना तसेच कामकाजासंदर्भांत आराखडा तयार करावा, अशा सूचना यावेळी न्यायमूर्तींनी दिल्यात.
यावेळी नागपूर खंडपीठाचे रजिस्ट्रार अमित जोशी, जनहित याचिका दाखल करणाऱ्या श्रीमती सुमेधा घटाटे, ॲङ श्रीनिवास देशपांडे, सरकारी अभियोक्ता ॲङ नितीन पाटील, महसूल उपायुक्त तथा विशेष अधिकारी मिलींद साळवे, मनोहर पोटे, विमानतळ अधिकारी यशवंत सराटकर आणि वरिष्ठ विमानतळ अधिकारी आबिद रुही, फ्लाईंग क्लबचे सर्व अधिकारी, पायलट व ग्राऊंड स्टाफ यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्षा प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी न्यायमूर्तींचे स्वागत करून नागपूर फ्लाईंग क्लब येथील प्रशिक्षणासाठी सज्ज असलेले विमान तसेच त्या अनुषंगीक बाबींची माहिती दिली.