संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी समारोप समारंभ थाटात संपन्न
कामठी :- कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी बिडी कामगाराकरिता संसदेत बिडी कायदा पारित करून घेतला, दीक्षाभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज उभारणीकरिता पुढाकार घेतला.
रिपब्लिकन पार्टी चे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी रिपब्लिकन पक्षाची बांधनी केली.बौद्धांना आनीसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्याकरिता 14 दिवसाचे आमरण उपोषण केले.अशा पद्धतीने कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्याकरिता महत्वपूर्ण योगदान दिले.असे मौलिक प्रतिपादन धम्मसेनानी पूज्य भन्तेजी आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी समारोप समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी समारोप समारंभाचे आयोजन शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कॅम्पस दादासाहेब कुंभारे परिसरात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला धम्मसेनानी व महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भन्तेजी आर्य नागार्जुन सुरई ससाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे होत्या.आज सकाळी साडे नऊ वाजता दादासाहेब कुंभारे परिसरात असलेल्या कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पास पुज्य भन्ते सुरई ससाई यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पस्थान ते विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस पर्यंत शांती मार्च काढण्यात आले.या शांती मार्च मध्ये हरदास विद्यालय ,दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यांनी तसेच धम्मसेवक धम्मसेविकानी मोठ्या संख्येत सहभाग घेतला.
विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुज्यनिय भिख्खू संघाच्या वतिने पुष्प अर्पण करण्यात आले व दादासाहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी पुज्यनिय भिक्खू संघाच्या वतीने विशेष त्रीशरण पंचशील व धम्मदेसना उपस्थितांना देण्यात आली.
धम्मसेनानी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते ,बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करिता संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व दादासाहेब कुंभारे यांचे निकटवर्तीय असलेले पुज्यनिय भन्तेजी आर्य नागार्जुन सुरई ससाई यांना चिवरदान ,मानपत्र व दादासाहेब कुंभारे स्मूर्तीचिन्ह देऊन ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी प्रा जोगेंद्र कवाडे ,समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक पुरण मेश्राम,साहित्यिक ईमो नारनवरे,आंबेडकरी विचारवंत विनायक जामगडे, प्रा राष्ट्रपाल मेश्राम,पूज्य भदंत नागदीपणकर थेरो,पुज्यनिय भदंत डॉ चिंचाल मेतानंद,पुज्यनिय भदंत प्रज्ञाज्योति,पुज्यनिय भदंत ज्योतिबोधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन राहुल बागडे यांनी केले तर आभार देवेंद्र जगताप यांनी मानले.तर कार्यक्रमाच्या अंती उपस्थित समस्त भीख्खू संघाला ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते भोजनदान व धम्मदान देण्यांत आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ,ओगावा सोसायटी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र ,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र ,ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल, दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी इत्यादींनी सहभाग घेतला.