कोराडीमध्ये ३९५ मूर्ती विसर्जित
नागपूर :- शहरातील दुर्गा उत्सव मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. मनपाद्वारे लक्ष्मीनगर, धरमपेठ आणि हनुमान नगर झोनसह कोराडी तलाव परिसरात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी एकूण ५६५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोराडी तलाव परिसरातील विशाल कृत्रिम विसर्जन तलावात ३९५ मूर्ती विसर्जित झाल्या. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्था साकारण्यात आली.
दुर्गोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील तीन झोन सह मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी परीसरात व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी देवीच्या मूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले होते. मनपाच्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्वाधिक मूर्ती विसर्जन कोराडी परीसरातील कृत्रिम तलावात झाले. यंदा दुर्गोत्सवातील मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी येथील कृत्रिम तलावात ३९५ मूर्तींचे विसर्जन झाले. शहरात झोननिहाय विविध भागातून नागरिकांनी कृत्रिम तलावात दुर्गा मूर्तींचे विसर्जन केले. शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावावर निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. कोराडी येथील कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले होते. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवकामार्फत निर्माल्य संकलन करण्यात आले. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंगची व्यवस्था होती. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाइट, जागोजागी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते.
झोननिहाय विसर्जीत केलेल्या दुर्गा
मूर्तींची संख्या
लक्ष्मीनगर- ५५
धरमपेठ- ७६
धंतोली- ३९
कोराडी कृत्रिम तलाव – ३९५
एकूण – ५६५
१६.२० टन निर्माल्य संकलित
नागपूर महानरपालिकेतर्फे दुर्गोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या निर्माल्य संकलन कलशात १६.२० टन निर्माल्य संकलीत करण्यात आले. नागपूरकरांनी पर्यावरणपूरक दुर्गाउत्सवाला प्राधान्य देत निर्माल्य संकलन कलशात पुजा साहित्य संकलीत केले. यात, लक्ष्मीनगर झोनमधून ४५ टन, धरमपेठ झोन ६७ टन, धंतोली झोन मधून ४५ टन निर्माल्य संकलीत करण्यात आले. तर, कोराडी परीसरात उभारण्यात आलेल्या निर्माल्य कलशात १४.६३ टन निर्माल्य संकलीत झाले.