समस्या निवारणासाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत
नागपूर, ता. १३ :- संपूर्ण नागपुरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नागपूरकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, शहरात पाणी जमा होणे, झाड पडणे अशा अनेक तक्रारी मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होत आहेत. नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींवर अग्निशमन विभागाद्वारे तात्काळ दखल घेत कार्यवाही केल्या जात आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. मनपाकडे विविध माध्यमातून प्राप्त होणा-या तक्रारींवर तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत आहे, त्यानुसार मंगळवार १३ सप्टेंबर रोजी सिव्हिल लाईन रामगिरी बंगल्या समोर रोडवर झाड पडल्याची माहिती मिळताच मनपा कर्मचाऱ्यांनी रोडवरील झाड चैनस्वाद्वारे कापून रोड रहदारीकरीता रस्ता मोकळा केला. तर गणेशपेठ पोलिस स्टेशनसमोर मंगलमअपार्टमेन्टच्या बेसमेंट मध्ये पाणी शिरले. प्राप्त तक्रारीवरून बेसमेंट मध्ये पंप द्वारे पाणी काढायला सुरुवात करण्यात आली. याशिवाय हुडकेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत बेसा घोगली नाल्यामध्ये मनुष्य पडल्याची सूचना मिळताच नरेंद्र नगर अग्निशमन पथक शोधकार्य करण्याकरीता गाडी आणि चमू घटना स्थळी रावांना केली.
पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये नागपूरकरांना भेडसावणा-या समस्यांवर दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन प्राधान्याने कार्य करीत आहे. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्याप मनपाच्या अग्निशमन विभागाचे जवान शहरात सर्वत्र सेवाकार्य बजावत आहेत.