आयआयएम नागपुरची नेट झिरो कडे वाटचाल होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २ मेगावॅट सौर प्रकल्पाचे भूमिपूजन

– २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के अपारंपरिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मिती

नागपूर :- भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूर मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे या संस्थेसाठी लागणारी ऊर्जा निर्मितीची गरज पूर्ण होऊन संस्थेची नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल होणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्ष २०३० पर्यंत राज्यात एकूण ऊर्जा निर्मितीपैकी ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

येथील मिहान परिसरात स्थित आयआयएममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण झाले, यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ.आशिष देखमुख, राज्य शासनाच्या विद्युत पारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजीव कुमार, आयआयएमचे संचालक डॉ. भिमराय मैत्री आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी ऊर्जा संक्रमणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक व नैसर्गिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मितीचे कार्य देशात सुरु आहे. आयआयएम नागपूरनेही यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. या प्रकल्पाची पायाभरणी होत असतांना नेट झिरो अर्थात आपली ऊर्जा गरज आपली भागवणे त्यातही अपारंपरिक ऊर्जा निर्मितीद्वारे स्वत:ची ऊर्जा गरज भागविण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. यात कमीत कमी वा शून्य कार्बन उत्सर्जन हे पण उद्दीष्ट असते.

राज्य शासनानेही ऊर्जा संक्रमणाचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. राज्य शासन अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. वर्ष २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के ऊर्जा निर्मिती ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून करण्याचे उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयआयएम परिसरातील गोल्फ अकॅडमीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ.आशिष देशमुख, आयआयएमचे संचालक डॉ. भिमराय मैत्री आदी उपस्थित होते. गोल्फ अकॅडमीद्वारे या संस्थेचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला असल्याच्या भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कृषि महोत्सवात कृषि किर्तनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Mon Mar 10 , 2025
Ø कापूस व इतर पिक लागवड तंत्रज्ञानाची माहिती Ø कपाशीची घन लागवडीची पध्दत व व्यवस्थापन यवतमाळ :- येथील समता मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषि महोत्सव व प्रदर्शनीत शेतकऱ्यांना कृषि किर्तनाच्या माध्यमातून कापूस व इतर पिकांची लागवड तंत्रज्ञान तसेच कृषिविषयक माहिती देण्यात आली. केंद्रीय कापुस संशोधन संस्था नागपूरचे डॅा.बाबासाहेब फंड यांनी हा किर्तनाचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी आत्माचे प्रकल्प संचालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!