समर्पित भावनेने काम केल्यास विकसित भारताचे लक्ष्य दहा वर्षे अगोदरच साध्य – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

– राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 

– विद्यापीठांनी वार्षिक वेळापत्रक, पदवीदान समारोहाची तारीख काटेकोरपणे पाळावी

मुंबई :- पूर्वीच्या तुलनेत आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. युवकांनी या संधींचा लाभ घेत देशासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यास विकसित भारताचे उद्दिष्ट्य 2047 च्या किमान दहा वर्षे अगोदरच साध्य होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि. 25) मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते.

विद्यापीठांच्या कुलगुरूंना विद्यापीठांचे वार्षिक शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्यास सांगितले असून प्रत्येक विद्यापीठाने आपला वार्षिक दीक्षांत समारोह शेवटची परीक्षा झाल्यानंतर एक महिन्यात करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छ भारत अभियानामुळे आज देशातील सर्व रेल्वे स्थानके तसेच रेल्वे ट्रॅक स्वच्छ झाले आहेत. विद्यापीठांनी आपापल्या विद्यापीठात हा कार्यक्रम यापुढेही राबवावा व शैक्षणिक परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर निश्चित असे ध्येय ठेवावे व ते गाठण्यासाठी आपल्या गतीने सातत्याने काम करावे. जीवनात शिस्त व नीतिमूल्ये पाळल्यास कोणतीही शक्ती तुम्हाला रोखु शकणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

आपण विद्यार्थी असताना टेबल टेनिस व मैदानी खेळात नियमितपणे सहभागी व्हायचो त्यामुळे आज ६८ व्या वर्षी आपले आरोग्य उत्तम असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष्य द्यावे असे राज्यपालांनी सांगितले.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सच्चिदानंद जोशी यांनी यावेळी दीक्षांत भाषण केले.

यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत पीएचडी, पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली तर 6 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत, कुलसचिव प्रा. विलास पाध्ये, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक नानासाहेब फटांगरे, तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता. प्राध्यापक, स्नातक विद्यार्थी तसेच निमंत्रित उपस्थित होते.

प्रारंभी कुलगुरू प्रा. कामत यांनी विद्यापीठाचा मागील वर्षाचा अहवाल सादर केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

Wed Mar 26 , 2025
– चित्रीकरणासाठी सात दिवसांत परवानगी – सांस्कृतिक कार्य विभागाच्या 100 दिवस कार्यपूर्तीसंदर्भात सादरीकरण मुंबई :- चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या सुलभरीतीने व मुदतीमध्ये मिळाव्यात या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीद्वारे एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबई व उपनगर परिसरात चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली अंतर्गत सात दिवसांत परवानगी मिळणार आहे. या प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!