पुणे :- ‘भाजपच्या दोन ओबीसी नेत्यांसह राष्ट्रवादीचे (अजित पवार पक्ष) सात नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या आठ ते नऊ फाईल्स माझ्याकडे आल्या आहेत. त्यामध्ये स्वच्छता कंपन्यांपासून ते काही नेत्यांच्या कंपन्यांनी प्रचंड आर्थिक प्रगती कशी केली. मुंबईतील आरक्षित जागा बिल्डरांच्या घशात कशा घातल्या?
मनी लॉन्ड्रींग, रुग्णवाहिकेतील भ्रष्टाचार, अशा अनेक प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पुरावे असलेल्या फाईल्स माझ्याकडे आहेत’ असा बॉम्ब राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी रविवारी टाकला. “योग्य वेळी व टप्प्याटप्प्याने ती सर्व प्रकरणे माध्यमांसमोर आणले जातील,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
बारामती ऍग्रो कंपनीप्रकरणी रोहित पवार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. सोमवारी ईडीच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेत सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई व महायुती सरकारवरच्या कारभारालाच हात घातला.
या सरकारमधील नऊ मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या फाईल्स आपल्याकडे असल्याचे सांगत त्यांनी खळबळ उडवून दिली. सरकार विरुद्ध लढण्यास सुरवात केल्यापासून माझ्याकडे निनावी व्यक्तीकडून नऊ फाईल्स आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पवार म्हणाले, ‘माझ्याकडे आलेल्या फाईल्समध्ये बॅंक घोटाळा व अन्य भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपच्या दोन ओबीसी नेत्यांचा समावेश आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सात नेत्यांच्या स्वच्छता कंपनीतील गैरप्रकार केला असल्याच्या फाईलींचाही समावेश आहे. एकाच पत्त्यावर चाळीस कंपन्या कोणी केल्या, त्याच्याही फाईल्स आहेत.
ईडीच्या कारवाईविरुद्ध न्यायालयात दाद मागणार
संभाजीनगर येथील बारामती ऍग्रो कंपनीविरुद्ध मुंबईतील आर्थिक गुन्हे विभागाने दोनदा तपास करून सप्टेंबर २०२०आणि जानेवारी २०२४ मध्ये फौजदारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यामध्ये या प्रकरणात कोणताही गुन्हा घडला नसल्याचा निष्कर्ष काढलेला आहे. असे सूनही पुन्हा ईडीने ही कारवाई केली, याचा अर्थ केंद्राचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास नाही.
त्यातही ईडीने दिलेल्या प्रेसनोट व चुकीच्या कारवाईसंदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. मुळात संचालक असताना कन्नड कारखाना विकला गेला नाही, आरबीआयने प्रशासक नियुक्त केले, २०११ नंतर बारामती ऍग्रो कंपनीने ४५ कोटी रुपयांचा हा कारखाना ५० कोटी रुपयांना खरेदी करून तो पुन्हा सुरु केला. लोकांना रोजगार दिला, आता त्याच ५० हजार कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे पवार यांनी सांगितले.
…मला जेलमध्ये टाकतील, तुम्ही लढा हाती घ्या!
ईडीकडून मला नोटीस येईल, असा अंदाज होता, तसाच आता मला दोन ते तीन महिने जेलमध्ये टाकले जाईल, याचाही अंदाज आला आहे. असे झाल्यास तुम्ही सर्वजण लढा. माझी पत्नी, मुले, आई-वडील तणावात आहेत. पण सगळेच विचार सोडून जायला लागले तर, लढणार कोण ? मी कुटुंबाची माफी मागतो, माझ्यामुळे तुम्ही अडचणीत येत आहात, अशी भावनाही पवार यांनी यावेळी व्यक्त केली.