मुंबई :- मुंबईमधून एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. मुंबईतील जे जे शासकीय रुग्णालयात 130 वर्षांचे भुयार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटिशांनी बनवलेले हा भुयारी मार्ग जवळपास 200 मीटर अंतराचा असल्याची माहिती समोर आली असून ही माहीती जगासमोर आल्याने कुतुहलाचा विषय निर्माण झाला आहे. जे जे शासकीय रुग्णालयात डी. एम. पेटीट या ब्रिटिश कालीन इमारतीत हे भुयार आढळून आले आहे. जवळपास 130 वर्षाची ही इमारत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या इमारतीत नर्सिंग महाविद्यालय आहे. रुग्णालय प्रशासनाने ही माहिती मुंबई शहर प्रशासनाला कळवली असून त्यानंतर ही माहिती जाहीर करण्यात आली आहे
जे जे शासकीय रुग्णालय परिसराची नियमित पाहणी करण्यासाठी वैद्यकीत अधिकारी डॉ. अरुण राठोड हे नर्सिंग महाविद्यालयात आले होते.राठोड यांनी पाहणी करत असतांना त्यांना नर्सिंग महाविद्यालयात भुयाराजवळ गेल्यानंतर काहीतरी असल्याचा त्यांना संशय आला होता.
राठोड यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने भुयारावर असलेले झाकण काढण्यास सांगितले आणि त्यांनंतर भला मोठा भुयारी मार्ग दिसल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले होते.
त्यांनंतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने याची पाहणी देखील करण्यात आली असून हे भुयार ब्रिटिशकालीन असल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत राठोड यांनी रुग्णालय प्रशासनाच्या मदतीने आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्यात आली असून याबाबत अभ्यास केला जाणार आहे.
दरम्यान 130 वर्षांपूर्वीचे भुयार आत्ताच कसे आढळून आले? इतके दिवस हे भुयार असूनही कुणाला का शंका आली नाही ? ब्रिटिशांनी हे भुयार कोणत्या कारणासाठी बनविले होते असे प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.