नागपुर :- हिंदू जनजागृती समितीने नागपूर जिल्ह्यातील “जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन देऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हिंदू समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलीस वरिष्ठ निरीक्षक आसाराम चोरमले यांना हे निवेदन देण्यात आले.” यावेळी चित्तपावन ब्राह्मण संघाचे सचिव उमाकांत रानडे, हिंदू जागरण समितीचे अध्यक्ष गंगाराम नटीये, सर्व भाषिक ब्राह्मण महासंघाचे डॉ. राजेंद्र दीक्षित, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे दिलीप कुकडे, प्रदीप पांडे, महादेव दमाहे, देवकुमार शर्मा, हिंदू जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा सेवक अतुल आर्वेनला आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी उपस्थित होते.राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे हिंदू जनजागृती समितीने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याची मागणी केली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने यापूर्वीही भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवादाची संकल्पना समाजात रुढ करून हिंदू समाजाची नाहक बदनामी केली होती.
हिंदू जनजागृती समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात, राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची सार्वजनिक आणि बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे. समितीने असेही सांगितले आहे की, राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला आहे, त्यामुळे त्यांच्या निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.