मोर्शी तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत करा !

– अटी निकष बाजूला ठेवून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी ! 

मोर्शी :- अवकाळी पाऊस, गारपीटमुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व जाचक अटी, निकष बाजूला ठेऊन मदत करण्यासाठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.

मोर्शी तालुक्यातील मार्च एप्रिल महिन्यात ४ ते ५ वेळा गारपीट, अवकाळी वादळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करत बळिराजाचे सांत्वन करत त्यांच्या व्यथा जाणून घेऊन तत्काळ पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती.

मोर्शी तालुक्यात संत्रा, मोसंबी, गहू, कांदा, टोमॅटो, मका, आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने नुकसान झाले असून शेतकरी संपूर्ण उद्धवस्त झाला आहे. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाने सर्व निकष, जाचक अटी बाजूला सारून पंचनाम्याची वाट न बघता मदत करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि मदत व पुनर्वसन सचिव यांना पत्र पाठऊन मागणी केली असल्याचे रुपेश वाळके यांनी सांगितले.

मोर्शी तालुक्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे संपूर्ण संत्रा शेतीचे नुकसान झाले आहे. शेतात हातातोडांशी असलेली पिके भुईसपाट झाली आहेत. संत्रा पिकांचे कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. गहू, भाजीपाला आणि संत्रा मोसंबी फळबागानांही मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांपुढे कसे जगावे हा प्रश्न आहे.

– शासकीय यंत्रणेने तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी तत्पर असायला हवे. अनेक ठिकाणी या बाबतीत दिरंगाई केली जाते. दुसरीकडे, शासनाकडे मदतीचे प्रस्ताव पाठवूनही त्यावर तत्काळ निर्णय घेतला जात नाही. शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळविण्यासाठी कित्तेक महिने प्रतीक्षाच करावी लागते. शेती संकटात असल्याचे वारंवार बोलले जाते, पण शासन स्तरावर शेतीच्या अर्थकारणाला बळकटी आणण्यासाठी पावले उचलली जात नाहीत ही शोकांतिका आहे

– रुपेश वाळके, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कीटकनाशक औषध खाल्ल्याने महिलेचा मृत्यु

Thu May 23 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मध्यप्रदेश राज्यातील शिवणी तालुक्यातील कामकासुर येथील रहिवासी एका विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणावरून धान्यात घालनारी सेलपॉस नामक कीटकनाशक गोळी खाल्याची घटना घडली असता उपचारार्थ कामठी च्या आशा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले मात्र परिस्थिती नाजूक असल्याने उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी साडे सहा वाजता घडली असून मृतक महिलेचे नाव मंजू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com