संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- देशात रस्त्यांचे अगदी जाळे विणले जात असले तरीही जड वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांनी गावखेड्यातून चोरट्या मार्गाने वाहतूक करत टोल नाके वाचविणे किंवा अवैध माल वाहतूक करणे काही सोडलेले नाही. याचे जिवंत उदाहरण बघायचे असल्यास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी एकदा तरी कामठी गुमथळा मार्गावरून सतत वर्दळ असणाऱ्या व जड वाहतूक करणाऱ्या ट्रककडे लक्ष द्यायला हवे.
कामठी गुमथळा मार्ग सध्या अवैध आणि जड वाहतुकीमुळे इतका गजबजलेला असतो की, केव्हा कुणाचा अपघात होईल, याची शाश्वती नसते. यापूर्वी सुद्धा या मार्गावर आजनी गावातील किमान तीन ते चार व्यक्तींचा अपघात होऊन मृत्यू झालेला आहे. त्यात दोन तरुणींचा समावेश होता. तरीही या मार्गावरून अगदी सुसाट पळणाऱ्या या गाड्यांचा वेग नियंत्रणात येताना दिसत नाही,तसेच आजनी रेल्वे क्रॉसिंग जवळ लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे शोभेच्या वस्तू तेवढ्या ठरत आहेत. अगदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ हे ट्रकचालक अगदी मुजोर होऊन आडवे तिडवे ट्रक लावतात. परिणामी अन्य वाहनांना आपली वाहने काढतांना बरीच कसरत करावी लागते. प्रसंगी वाहनांची बरीच मोठी रिघ या क्रॉसिंग जवळ लागल्याने नोकरीवर जाणाऱ्या चाकरमाण्यांची व विद्यार्थ्यांची दमछाक होऊन जाते. . पुढे सुरू होणाऱ्या शाळा बघता या मार्गावरून कितीतरी विद्यार्थी सायकलने कामठीला ये जा करणार आहेत. या जड वाहतुकीमुळे त्यांच्या जीवाला होणारा धोका लक्षात घेता, या जड वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.