संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
येरखेडा भारत टाऊन येथील घटना
कामठी, ता.१५ : एकीकडे तालुक्यातील अंगणवाड्यातून बालकांना घरपोच दिला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे बालकांना मोफत मिळणार सकस आहार अंगणवाडी सेविकेने बालकांना न वाटप करता चोरीच्या उद्देशाने अंगणवाडीच्या बाजूला असलेल्या घरी लपवून ठेवला हा प्रकार नागरिकांच्या लक्षात चोरीचे बिंग फुटण्याच्या भीतीने या अंगणवाडी सेविकेणे आहाराचे सीलबंद पॉकेटचे बोरे जवळच असलेल्या झाडाझुड पात फेकून दिल्याची घटना आज बुधवार (ता. १५) रोजीकामठी तालुक्यातील येरखेडा गावातील भरत टाऊन येथील अंगणवाडी क्रमांक ११ मध्ये उघडकीस आली.
बालकांमधील कुषोषण कमी होण्यासाठी त्यांना सकस आहार देण्यासाठी शासनाच्या वतीने पोषण आहाराचे वितरण केले जाते. बालकांसाठी घरपोच सकस आहार मिळावा म्हणून धान्य वाटप केले जाते. यात गहू, तांदूळ, मुंगदाळ, चणा, सोजी, तिखट, साखर, तेल, आटा आदी साहित्याचे पाकीट दिले जात आहे. परंतु कामठी तालुक्यातील येरखेडा गावातील भरतटाऊन येथील अंगणवाडी क्रमांक ११ मध्ये आलेले आहाराचे साहित्य लाभार्थ्यांना वाटप न करता परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने अंगणवाडीच्या बाजूला असलेल्या दोन घरी आहार लपवून ठेवला याची कुणकुण परिसरातील नागरिकांना लागल्याने त्याची तक्रार ग्रामपंचायतीला केली.
चोरीचे बिंग फुटण्याच्या भीतीने अंगणवाडी सेविकेणे आहाराचे सीलबंद पॉकेटचे बोरे जवळच असलेल्या झाडाझुडपात फेकून दिले. आज बुधवार (ता. १५) रोजी ग्रामपंचायतचे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कामठीच्या पर्यवेक्षिका एम.एच. कोल्हे यांच्या समक्ष सरपंच सरीता रंगारी, सचिव जितेन्द्र डावरे, ग्रामपंचायत सदस्य सतीश दहाट, रोशनी भस्मे, ग्रा. पं. लिपिक जॉनी वंजारी यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अंगणवाडीला भेट देऊन प्रत्यक्ष शहानिशा केली असता बाजूच्या दोन घरी लपवून ठेवलेले साहित्य वार्डातील नागरिक सचिन भोयर, निखिल नंदेश्वर, संगीता करडभाजणे, असीमा बानो, पानतावणे, शबनम बानो, राजकुमार कुंभलकर, सुलताना बानो आदी नागरिकांच्या उपस्थितीत बालकांच्या पोषण आहाराचे साहित्य पंचनामा करून साहित्य जप्त करण्यात आले. काही आहाराचे निकृष्ट दर्जाचे येत असल्याचा आरोप काही पाल्यांकडून केला गेला. तेव्हा अंगणवाडीतील पोषण आहाराचे साहित्य तपासले. यात निकृष्ट दर्जाचा माल दिसून आला. त्यांनी तालुका पर्यवेक्षिका यांच्याकडे तक्रार केली. बालकांमधील कुपोषण कमी न होता वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. तर प्रशासनाकडून बालकांच्या जीवाशी खेळ मांडू नये अशी मागणी उपस्थित नागरिकांनी यावेळी केली.अखेर तालुका पर्यवेक्षिका कोल्हे यांनी पोषण आहाराचा पंचनामा केला. यावर ग्रामपंचायत आक्रमक झाली असून त्यांनी सेविकेला धारेवर धरत संबंधित विभागाला कारवाई करण्याचा सूचना दिल्या. यावर एकात्मिक बालविकास अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.