नागपूर :- राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण्यासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती, आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील आरोग्य सुविधेबाबत सदस्य अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री सावंत बोलत होते.
आरोग्य मंत्री सावंत म्हणाले आरोग्य व्यवस्थेत उपलब्ध संसाधनांचा 100 टक्के वापर चांगल्या पद्धतीने करणे, विभागातील आशाताईंपासून डॉक्टर, नर्स या मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढवणे आणि रुग्णांसोबत आत्मियतेने वागण्याबाबतची आदर्श कार्यपध्दती (एसओपी) करण्याचे काम सुरू आहे. रुग्णालय इमारत आदी संसाधनांची दुरुस्ती करून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करण्याचे काम सुरू आहे.
आरोग्य व्यवस्थेसाठी राज्य शासनाने वेळोवेळी मदत केली आहे. राज्यातील 12 कोटी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज वाढली आहे. आरोग्य व्यवस्थेत वाढ होणे आणि अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ होणे अपेक्षित आहे. सन 2012 पासून बिंदूनामावली तयार नव्हती ती करण्यासाठी देखील एसओपी करण्याचे काम सुरू असून मॉडेल आरोग्य यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचे परिणाम येत्या काळात दिसून येतील.
पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील असुविधेबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक
भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील शवागारात शवपेट्या नादुरुस्त असल्यामुळे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवावे लागल्याचा प्रकार घडला होता. या रुग्णालयातील शवागारात शवपेट्या खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधी देऊन शवपेट्या खरेदी करण्याच्या सूचना आजच देण्यात येतील. हे रुग्णालय महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. रुग्णालयातील असुविधेबाबत लवकरच मा.मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री श्री. सावंत यांनी सभागृहात सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य प्रताप सरनाईक, बच्चू कडू, मनीषा चौधरी यांनी सहभाग घेत उपप्रश्न उपस्थित केले.