यवतमाळ :- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ, प्रतिबंध, निवारण कायदा तसेच महाराष्ट्रात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले व मार्गदर्शक म्हणून पॅनल वकील निलिमा जोशी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणाल नहार यांनी शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरीकांना शासनाच्या प्रत्येक योजनेबाबत माहिती असणे गरजेचे आहे, असे सांगितले. जिल्हा विधीसेवेचे कार्य काय आहे व मोफत विधी सेवा कोणाला पुरविली जाते याबाहत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या माध्यमातून विधी सेवेच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजनेबाबत सुध्दा विस्तृत माहिती नहार यांनी दिली.
यावेळी अँड.निलिमा जोशी यांनी कामाच्या ठिकाणी महिलांना होणारा छळ याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित असलेल्या महिला कर्मचारी यांना राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराची माहिती दिली. ज्या ठिकाणी महिला काम करते, त्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असेल तर त्या ठिकाणी महिलांच्या संरक्षणाकरीता एक समिती निर्माण झालेली असते. अशा ठिकाणी छळ झालेल्या महिलांना त्या समितीकडे तीन महिन्यांच्या आत लेखी स्वरूपात तक्रार करता येते. महिलांनी खोटी तक्रार दिली तर त्याच्या परिणामांची देखील माहिती दिली. कार्यकमाचे संचालन स्नेहा खडसे यांनी केले तर आभार प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांनी मानले. या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने महिला कर्मचारी व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.