डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटीच्या ‘पीपीपी’ संदर्भात घेतला समाचार
नागपूर, ता. ४ : उत्तर नागपुरातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ येथील स्थानिक नागरिकांसह मध्य भारतातील दलित, शोषित गोरगरिबांकरिता हक्काची संस्था व्हावी, याकडे लक्ष न देता ते सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात ‘पीपीपी’ तत्वावर देऊन त्याचे खासगीकरण केले जात आहे. ह्या रूग्णालय विकासाच्या मोठमोठ्या गोष्टी करून, अर्थसंकल्पात निधी प्राप्त झाल्याचा कांगावा करून मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांच्या आभार आणि अभिनंदनाची पोस्टरबाजी करणारे राज्याचे ऊर्जा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. नितीन राऊत स्वतःच्या मतदार संघातील एवढ्या मोठ्या संस्थेबाबत गांभीर्य दाखवत नाहीत तर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत झोपा काढतात का ? असा खोचक सवाल भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केला.
उत्तर नागपुरातील कामठी रोडवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ या वैद्यकीय संस्थेला सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात ‘पीपीपी’ तत्त्वावर देण्याबाबत मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग विभागाद्वारे पीपीपी द्वारे संस्थेचा विकास करण्याबाबत नोटीस काढण्यात आल्या प्रकरणी ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले, दलित, शोषित, मागासवर्गीयांना लक्षात घेऊन त्यांना आरोग्याच्या चांगल्या सोयी पुरविता याव्या या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र हे प्रयत्न सोडून आता ही संस्था सार्वजनिक खासगी भागीदारीमध्ये आणल्यामुळे मुळात त्याचे खासगीकरण होईल. आणि त्याचा लाभ वंचित, दलित, शोषित, पीडित मागासवर्गीय समुदायाला मिळणार नाही. या संस्थेमध्ये पदव्युत्तर कोर्सेस आणि अतिविशेषोपचार सुरू करण्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आश्वासन देण्यात आले होते. परंतू ते आता सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात ‘पीपीपी’ या तत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने ११६५.६५ कोटी रुपये या संस्थेच्या विकासासाठी प्राप्त झाले असल्याबाबत संपूर्ण शहरभर मुख्यमंत्र्यांचे आणि वित्तमंत्र्यांचे आभार मानणारे आणि पालकमंत्र्यांचे कौतुक करणारे होर्डिंग लावण्यात आले होते. त्याचवेळी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून भूमिका मांडत केवळ कोरे आश्वासन असल्याचे आपण सांगितले असून आज ते खरे ठरल्याचे सांगतानाच ह्या वसुलीबाज सरकारच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत असल्याचे ऍड. मेश्राम म्हणाले. अशाही प्रश्नावर महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आणि ही संस्था ज्या मतदारसंघात आहे त्या उत्तर नागपूरचे प्रतिनिधित्व करणारे नितीन राऊत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चीतपणे झोपा काढतात व त्यांचे कोणीही ऐकत नाहीत हेच ह्यातून निदर्शनास येत असल्याचे देखील ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी नमूद केले.
गोरगरिबांच्या आरोग्याचा प्रश्न, त्यासाठी मिळणारी सुविधा या बाबींचे गांभीर्य नसल्याचा हा प्रकार आहे. या सर्व प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून तात्काळ मागच्या आर्थिक वर्षात ठरलेल्या योजनेप्रमाणे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’च्या विकासासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या आणि मध्य भारतातील दलित, शोषित, गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना शासकीय नियमाप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी, अशी मागणी देखील ऍड . धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.