प्रजासत्ताक दिनाला पालकमंत्री देवेंद्र फडणवीस करणार ध्वजारोहण, विभागीय आयुक्ताची आढावा बैठक

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते २६ जानेवारी रोजी कस्तुरचंद पार्क येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. आज या संदर्भात विभागीय आयुक्तांनी आढावा बैठक घेतली.

कस्तुरचंद पार्क येथे २६ जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली. विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आयोजनादरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या.   

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीस आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभागासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. २३ जानेवारी पर्यंत कस्तुरचंद पार्क येथे पोलीस विभाग व शालेय शिक्षण विभागाच्यावतीने विविध कार्यक्रमाचा सराव तर २४ जानेवारीला मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम होणार आहे, याबाबत विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह विभागातील अन्य पाच जिल्ह्यांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या आयोजना दरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचनाही डॉ. बिदरी यांनी दिल्या.

सकाळी ९.१५ वाजता होणार मुख्य समारंभ

उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण होणार आहे. या कालावधीत कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात येऊ नये, असे आदेश आयुक्तांनी या बैठकीत दिले. अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी ८.३० वाजता किंवा सकाळी १०.०० वाजेनंतर ध्वजारोहण करता येणार आहे. सर्व कार्यालयांनी याची नोंद घेण्याची सूचना त्यांनी केली.

शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई

प्रजासत्ताकदिनी नागपूर विभागातील सर्व शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्तांनी दिली. प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक सिताबर्डी किल्ल्यावरही ध्वजारोहण करण्यात येणार आहे व सर्वसामान्यांसाठी हा किल्ला सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत खुला राहणार आहे. याशिवाय प्रजासत्ताकदिनाचे सुसूत्र पध्दतीने आयोजन होण्यासाठी संबंधित विभागांना आयुक्तांनी यावेळी आवश्यक निर्देश दिले.

26 जानेवारीच्या कस्तुरचंद पार्क वरील कार्यक्रमासाठी सामान्य नागरिकांनाही उपस्थित राहता येणार आहे. याशिवाय या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक ,त्यांचा परिवारातील सदस्य, सैन्य दलातील अधिकारी त्यांच्या परिवारातील सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी या कार्यक्रमाचे समाज माध्यमांवर प्रसारण केले जाणार आहे त्याची लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 26 जानेवारीला सायंकाळी स्थानिक वसंतराव देशपांडे सभागृहात शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून या देशभक्तीपर कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक उद्योगांना महाराष्ट्राचे आकर्षण! महाराष्ट्राच्या बदनामीचा ठाकरे कुटुंबाचा कट उद्योगविश्वाने उधळला भाजपाचे आ. प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन

Wed Jan 18 , 2023
मुंबई :- उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळून लावल्याचे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात १.३७ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पावती दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दाखविला आहे, असे प्रतिपादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com