नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून उद्या, रविवार, दि. २ मार्च २०२५ रोजी श्रीक्षेत्र आदासा येथे सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
रविवार दि. २ मार्चला सकाळी ७.१५ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. भाविकांनी सकाळी ७ पर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचणे अपेक्षित आहे. यावेळी ना. नितीन गडकरी स्वतः सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. श्री गणपती अथर्वशीर्ष स्तोत्राच्या २१ आवर्तनांचे यावेळी सामूहिक पठण होणार आहे. त्यानंतर आरती होईल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आयोजन समितीने नागपूर शहर व नागपूर ग्रामीणमधील सर्व भाविकांना आमंत्रित केले आहे. संस्था, संघटना, धार्मिक प्रतिष्ठानांसह भाविक आपल्या कुटुंबासह व्यक्तिशः देखील यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. गणेशभक्त स्वतःच्या वाहनाने कार्यक्रमस्थळी येऊ शकतात.
सायंकाळी भक्ती गीतांची मेजवानी
रविवार, दि. २ मार्चला सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायक मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचा भक्तीगीते व भजनांचा कार्यक्रम होईल. धापेवाडा येथील नदी शेजारील प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.