नागपूर : सामाजिक क्रांतिचे अग्रदूत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी नागपूर शहरच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शहरातील कॉटन मार्केट स्थित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सतीश शिरसवान, ॲड. राहुल झांबरे, रोशन बारमासे, शेषराव गजघाटे, राजेश संगेवार, सुरेश बारई, अशोक देशमुख, राम सामंत, विक्रम मानकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरू मानून त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत समाजोध्दाराचे कार्य केल्याचे यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले. जाती-धर्मातील भेदाभेद नष्ट करून अठराव्या शतकात निर्भीडपणे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतिची ज्योत पेटविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्यांनी केले. त्यावेळी बहुजन समाज दारिद्र आणि अज्ञानात खितपत पडलेला होता. शिक्षण मुठभर लोकांनाच घेण्याचा अधिकार होता. याशिवाय सावकारांच्या पाशात समाज त्रस्त होता. अशा कालखंडात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे बीज रोवून नवी क्रांती घडविली. त्यांनी बालविवाहावर निर्बंध घालून विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्याचे काम केले. असंख्य हालअपेष्टा सहन करून विपरीत परिस्थितीचा सामना करून महात्मा फुले यांनी केलेल्या तत्कालीन कार्य आजच्या आपल्या मोकळ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ असल्याचेही ते म्हणाले.