नाट्य प्रशिक्षणातून महानिर्मिती नाट्य कलावंतांनी बाह्यजगतामध्ये नावलौकिक वाढवावा…पंकज सपाटे
दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी आपण ज्या भूमिका वठवतो तो अभिनयाचाच एक भाग…विठ्ठल खटारे
नागपूर : वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत खडतर स्वरूपाच्या दैनंदिन कामकाजातून नाट्य कलागुण जोपासण्याचे काम महानिर्मितीचे कर्मचारी करीत आहेत ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. महानिर्मितीच्या नाट्य कलावंतांना नाट्य प्रशिक्षण दिल्यास दर्जेदार नाट्यकृती बाह्य जगतात सादर करून नावलौकिक वाढवता येईल असे कार्यकारी संचालक पंकज सपाटे यांनी सायंटीफिक सभागृह, लक्ष्मीनगर, नागपूर येथे प्रतिपादन केले. महानिर्मितीच्या नाट्यस्पर्धा उद्घाटनपर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील रामटेके यांनी भूषविले.
याप्रसंगी, प्रमुख पाहुणे कार्यकारी संचालक विठ्ठल खटारे, विशेष अतिथी म्हणून मुख्य अभियंते राजू घुगे, शरद भगत, विवेक रोकडे, राजेश कराडे, नारायण राठोड, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी आपण ज्या भूमिका वठवत असतो तो अभिनयाचाच एक भाग असल्याचे विठ्ठल खटारे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. प्रारंभी लीना पाटील आणि चमूने उत्तम स्वागतगीत सादर केले तर प्रास्ताविकातून नाट्यस्पर्धा आयोजनामागची भूमिका पुरुषोत्तम वारजुरकर यांनी मांडली. शरद भगत, राजू घुगे, विवेक रोकडे, सुनील रामटेके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर संचालक (संचलन-प्रकल्प) संजय मारुडकर यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रवीण कुळकर्णी, संजय हळदीकर, वैदेही चवरे (सोईटकर) हे करीत आहेत. उद्घाटन समारंभाचे बहारदार सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी तर उपस्थितांचे आभार अमरजित गोडबोले यांनी मानले.
याप्रसंगी उप मुख्य अभियंते डॉ. अनिल काठोये, विलास मोटघरे, जितेंद्र टेंभरे, अधीक्षक अभियंते संजय तायडे, प्रवीण रोकडे, संजीव पखान, विश्वास सोमकुंवर, उमेद श्यामकुंवर, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक अमित ग्वालबंशी, कल्याण अधिकारी अमरजित गोडबोले, पंकज सनेर, दिवाकर देशमुख, सहाय्यक कल्याण अधिकारी कीर्ती ठाकरे, दिलीप वंजारी, रानु कोपटे, योगेश चोपडे, सर्व संघ व्यवस्थापक, संघटना प्रतिनिधी, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, नाट्य कलावंत, कुटुंबीय, परिसरातील नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन समारंभानंतर लगेच खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातर्फे “नथिंग टू से” या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.