मुंबई : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर दहीवद, ता. शिरपूर जि. धुळे हा कारखाना सरफेसी (सेक्युरायझेशन ॲक्ट) नुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताब्यात घेऊन भाडेतत्वाने सुरु करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करणेबाबत आज सहकार मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस साखर आयुक्त शेखर गायकवाड, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पटेल, जिल्हा बँकेचे संचालक के.डी.पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, संघर्ष समितीचे प्रमुख डॉ.जितेंद्र ठाकूर, ॲड.गोपालसिंग राजपूत, मोहन पाटील, कल्पेश जमादार, मिलिंद पाटील, शिरीष पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
सहकार मंत्री पाटील म्हणाले, हा कारखाना सुरु करण्यासाठी बँकेचे व कारखान्याचे संचालक मंडळ सकारात्मक असेल तर शासन सर्व सहकार्य करण्यास तयार आहे. या कारखान्याची काही जमीन ‘ब’ वर्गाची असल्यामुळे कारखाना भाडेतत्वावर देण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची संमती घ्यावी लागेल असे कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. यासंदर्भात साखर आयुक्त यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याशी आवश्यक तो समन्वय करावा असे सहकार मंत्री पाटील यांनी निर्देश दिले.
साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना हा केंद्रीय निबंधक यांच्या अखत्यारित येत असला तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सरफेसी कायद्यानुसार कारखाना भाडेपट्याने देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार बँकेने कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी सरफेसी कायदयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यास हरकत नाही.