मुंबई :- नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत ऐवजदार सफाई कामगारांच्या नियमितीकरण संदर्भात शासन सकारात्मक असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरावेळी सांगितले.
सदस्य प्रवीण दटके यांनी या संदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.
मंत्री उदय सामंत यांनी सांगितले, ऐवजदार सफाई कामगार हा संवर्ग (कॅटेगिरी) फक्त नागपूर महानगरपालिकेतच आहे. यामध्ये २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या ३८३३ पात्र ऐवजदार कर्मचाऱ्यांन अधिसंख्य पदावर सामावून घेण्यात आलेले आहे. २० वर्ष पेक्षा कमी सेवा झालेले ४२९ कर्मचारी ऐवजदार पदावर सध्या कार्यरत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत सात हजार आपत्कालीन पदांसाठी मंजुरी दिली आहे. या पदांवर पात्र ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीचे लाभ मिळतील, असेही त्यांनी सांगितले.