अमरावती :- शासन सेवेत असतांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष अधिकार (Special Status) प्राप्त असतात. त्या अधिकाराचा वापर संवेदनशील राहून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी करावा, सेवानिवृत्त कर्मचारी म्हणजेच वयाणे जेष्ठ याचे भान ठेवत त्यांचा मान राखल्या गेला पाहिजे. नियमांचा योग्य उपयोग त्यांचे कल्याणाकरीता करा. असे आवाहन सर्व शासकीय अधिकाऱ्यांना खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ.बोंडे यांच्या निवासस्थानी दि.१५ आक्टोंबर,२०२२ रोजी कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, अमरावती चे सहसंचालक डॉ.केशव तुपे व त्यांचे सहकारी नांदगांवकर हे यावेळी उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन व इतर आर्थिक लाभ दीर्घ काळापासून रखडले होते, त्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी डॉ.अनिल बोंडे यांची भेट घेऊन त्यांचे समक्ष आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्याला त्वरित प्रतिसाद देऊन डॉ.बोंडे यांनी विद्यापीठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी सर्व हेमंत श्रीखंडे, वासुदेव धस्कट व राजेश पिदडी यांचे सोबत दि.१२ सप्टेंबर,२०२२ ला मुंबई येथे ना.चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची त्यांचे निवासस्थानी डॉ.बोंडे यांनी भेट घडवून आणली व समस्या मांडल्या होत्या.
याप्रसंगी शिक्षण मंत्र्यांनी प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन व ईतर समस्यां संदर्भात तातडीने उपायोजना करण्याच्या सूचना, उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ.धनंजय माने व इतर अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या आदेशानुसार सर्व निवृत्त विद्यापीठ कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांचे निवृत्तीवेतन व इतर प्रलंबित बाबींवर सकारात्मक उपाय योजना संदर्भाने त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे डॉ. केशव तुपे यांनी कौटुंबिक स्वरूपाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वांना आश्वासित केले. याप्रसंगी विद्यापीठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सामाजिक जाणीवेतुन केलेल्या सहकार्याबध्दल डॉ.अनिल बोंडे व डॉ.केशव तुपे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.याप्रसंगी प्रास्ताविके अंतर्गत प्रवीण भिशीकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यातील तांत्रिक बाबी विशेष करून त्या त्वरित दूर करण्यासाठी सहसंचालक उच्च शिक्षण यांना विनंती केली व सहकार्य करण्याचे आवाहन केले. सहसंचालक उच्च शिक्षण डॉ.तुपे यांनी सुद्धा समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. संजय ढोरे यांनी आभार प्रदर्शन व राजेश पिदडी यांनी कार्यक्रमाचे बहारदार शेरोशायरीसह संचालन केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील बहुसंख्य सेवानिवृत्त बंधू भगिनी उपस्थित होते. राजेश पिदडी यांनी गायलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या श्राव्य भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीते- साठी हेमंत श्रीखंडे, संजय भडांगे, मिलींद बरबडे, निदान बारस्कर, नंदकुमार भगत, पुरुषोत्तम सदावर्ते, वासुदेव धस्कट, मनोहर डोळस,संजय ढोरे, रमेशभाऊ व-हाडे,सुनील सोमवंशी, निलीमा धुळे,मेंढे,इत्यादी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.