टाकाऊ वस्तूंमधून मिळाले विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पनाना बळ

-अपूर्व विज्ञान मेळाव्याला केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी शनिवारी देणार भेट

 

नागपूर : रिकामी पाण्याची बॉटल, प्लास्टिकचे कप, सलाईनच्या नळ्या, गंज लागलेले खिळे, फुगे, कागद, लाकडी पाटी, दगड, जुने नट-बोल्ट या टाकाउ वस्तूंसह घरातील रिकामी बादली, सुई, धागा या वस्तूही वैज्ञानिक प्रयोग करून त्यातून वैज्ञानिक जाणीवांना बळकटी प्रदान करू शकतात. हे केवळ एखाद्या पुस्तकात वाचताना अथवा टिव्हीवर पाहतानाच दिसून येते असे नाही तर प्रत्यक्षात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी हे प्रयोग करीत आहेत व त्याची माहितीही इतरांना देत आहेत. नागपूर महानगरपालिकेच्यावतीने असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एजुकेशन (एआरटीबीएसई) यांच्या सहकार्याने झाशी राणी चौक येथील राष्ट्रभाषा भवन येथे अपूर्व विज्ञान मेळावा हा विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना, त्यांच्या कल्पनांसह त्यांची जिज्ञासा जागृत करणारा मेळावा ठरत आहे. देशात प्रसिद्ध असलेला अपूर्व विज्ञान मेळाव्यातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रयोगांची अपूर्वाई अनुभवण्यासाठी शहरातील विद्यार्थी, शिक्षक, पालक सारेच गर्दी करीत आहेत, हे विशेष. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी शनिवारी दुपारी १२ वाजता अपूर्व विज्ञान विज्ञान मेळाव्याला भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत रघु ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

            अपूर्व विज्ञान मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वेगळी अनुभूती, प्रयोगाची संधी, ध्येयनिश्चितीचा मार्ग आणि म्हणूनच त्यासाठी विद्यार्थी सातत्याने धडपडत असतात. नागपूर मानहागरपालिकेच्या विविध शाळेतील विद्यार्थी अपूर्व विज्ञान मेळाव्यात टाकाऊ जे कुणालाही सहज मिळेल अशा वस्तूंचा उपयोग करून वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञानाविषयी माहिती देत आहेत. मेळाव्यामध्ये इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील रसायनशास्त्र,  जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या विषयांतील प्रयोग करून दाखविण्यात येत आहेत. ‘चला मैत्री करूया विज्ञानाशी’ हे घोषवाक्य यशस्वी करण्यासाठी मनपाच्या विविध शाळेतील २०० विद्यार्थी जवळपास १०० प्रयोग करून दाखवत आहेत. सर्व प्रयोग, विज्ञानाचे कठीण नियम सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहेत.

            मानवी शरीराची रचना, ज्ञानेंद्रियांसोबतच शरीराच्या आतील महत्वाचे अवयव कसे असतात, ते कसे कार्य करतात हा कुतूहलाचाच विषय. मात्र या अवयवांची माहिती जर प्रत्यक्षात हे अवयव दाखवून दिले तर ते चिरकाळ स्मरणात राहणारे ठरते. हिच बाब हेरून अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह इतर शाळेतील विद्यार्थी प्राण्यांच्या मेंदू, हृदय, फुफ्फुस, किडनी व अन्य अवयवांचा आधार घेत माहिती देत आहेत. विद्यार्थ्यांच्या या प्रायोगिक स्टॉलपुढे कुतुहलापोटी विद्यार्थीही चांगलीच गर्दी करीत आहेत. मनपाच्या दत्तात्रयनगर माध्यमिक शाळेची करिष्मा दिनेश शाहू जनावराचा प्रत्यक्ष ‘हृदय’ तर बॅरिस्टर वानखेडे शाळेची तनवी जनबंधू ही जनावराची प्रत्यक्ष किडनी दाखवून त्याबद्दल भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती सांगत आहे. तसेच श्री गुरु गोविंदसिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी  मेंदू, फुफ्फुस दाखवून या अवयवांबद्दल आणि त्यांच्या कार्याची माहिती देत आहेत. यामध्ये तसमिया खान, सिमरन शर्मा, हिमाक्षी यादव या विद्यार्थिनींचा सहभाग आहे.

            यात नागपूर महानगरपालिकेच्या वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा, दत्तात्रय नगर माध्यमिक शाळा, सुरेंद्रगड  हिंदी माध्यमिक शाळा, दुर्गानगर माध्यमिक शाळा, स्व. साखरे गुरुजी प्राथमिक शाळा, विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा, लाल बहादूर शास्त्री शाळा, संजय नगर माध्यमिक शाळा, एमएके आजाद उर्दू माध्यमिक शाळा, ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळा आदी शाळां सहभाग घेतला आहे.

            सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांच्या मार्गदर्शनात शगुन हरिसिंग चंदेल ‘पंजा टाटा करताना’, प्रिया मिश्रा ‘आधी कोणती बॉटल खाली होणार’, नीलम मोते ‘ऑटोमिक सायफन’, अर्चना पटेल कमी दाबाचा फवारा, देवश्री मिश्रा ‘जास्त दाबाचा फवारा’, कलश राजपूत ‘बॉटल शॉवर’ यासारखे १५ पेक्षा जास्त प्रयोग करून माहिती सांगत आहेत. तसेच विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील अनिकेत बैरासी ‘पेंडुलम प्रयोग’, मोहन शाहू ‘कॉपर सल्फेट रंग का बदलतो?’, सपना कोपर्डे ‘शेंदूर रंग का बदलतो’ असे विविध प्रयोग करून दाखवत आहेत. सोबतच संजयनगर माध्यमिक शाळेचे लीलेय देशमुख ‘हॅंगरवर फिरणारं कॉईन’, कुंदन फाल्गुन ‘पाण्याची रेल्वेगाडी’, चतुर चाकोले ‘हथेली मे छेद’, दुर्गानगर माध्यमिक शाळेतील साहिल गिरी ‘क्षेत्र आणि दाब यांचं संबंध’, श्रेया धाबर्डे ‘रेसोनांस’, दत्तात्रय नगर शाळेतील शक्ष्मी शाहू ‘बस थांबते पण आपण नाही’, करिष्मा दिनेश शाहू ‘प्रत्यक्ष जनावराचे हृदय दाखवून माहिती’, बॅ. वानखेडे शाळेतील तनवी जनबंधू या विद्यार्थिनीने प्रत्यक्ष जनावराची किडनी दाखवून त्याबद्दल माहिती दिली.

दरवर्षी अपूर्व विज्ञान मेळावा देतो नवी शिकवणूक  : डॉ. कृष्णा खैरनार

            अपूर्व विज्ञान मेळाव्यात येऊन विज्ञानाच्या संकल्पना सहजतेने समजून घेता येतात. खेळीमेळीच्या वातावरणात रंजक पद्धतीने विज्ञान शिकता येतो. या मेळाव्यात दरवर्षी एक समानता पाहायला मिळते ती म्हणजे सहजता आणि साधेपणा. येथे आल्यानंतर काहीतरी नवीन अनुभव आत्मसात करता येत असून अपूर्व विज्ञान मेळावा दरवर्षी नवी शिकवणून देतो, असे प्रतिपादन निरीचे पर्यावरणीय विष्णुशास्त्र आणि कोविड-१९ चाचणी केंद्राचे विभाग अध्यक्ष डॉ. कृष्णा खैरनार यांनी केले. शुक्रवारी (ता.१७) डॉ. कृष्णा खैरनार यांनी आपल्या संशोधन अभ्यासक टीम सोबत झाशी राणी चौक येथे आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्याला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, जेव्हा आम्ही अभ्यास करायचो, त्यावेळी पालकांच्या मदतीशिवाय कोणताही प्रयोग पूर्ण होत नव्हता. मात्र येथील विद्यार्थ्यांनी साकारलेले प्रयोग बघितल्यानंतर कोणीही सहज विज्ञानाचे प्रयोग तयार करू शकतो. संशोधन अभ्यासकांनी प्रयोग करणाऱ्या मुलांच्या सादरीकरणाच्या पद्धतीचे आणि मनपाच्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले.

माती आणि सूर्यप्रकाशाशिवाय वनस्पतींचे पोषण

            अपूर्व विज्ञान मेळ्यात रिसोर्स पर्सन म्हणून पाटणा येथील मोहम्मद जावेद आलम, मध्य प्रदेशमधून राजनारायण राजोरीया, कोल्हापूरचे रामचंद्र लेले आलेले आहेत. मोहम्मद आलम माती, सूर्यप्रकाशाशिवाय वनस्पतींच्या पोषणाबाबत माहिती देत आहेत. हायड्रोपोनिक्सच्या तत्त्वावर काम करताना, मोहम्मद जावेद आलम यांनी असा जलीय पोषण आहार आणि पद्धत शोधून काढली आहे ज्याद्वारे सर्व प्रकारची झाडे कुठेही लावता आणि वाढवता येतात. मो. आलम यांनी हे पेटंट ‘आलम जल कृषी विधी आणि बायो-फर्ट-एम पोषक तत्व या नावाने घेतले आहे.

 गणिताबद्दल आवड निर्माण करण्याचे उद्दिष्ट : श्री. राजोरिया

            मध्य प्रदेशच्या भिंड येथून आलेले राजनारायण राजोरिया गणितातील विविध पद्दतीबद्दल माहिती देत आहेत. गणिताला सोपे कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करीत आहेत. राष्ट्रपती पुरस्कार आणि मध्य प्रदेश सरकारकडून रामानुज पुरस्काराने सन्मानित श्री. राजोरिया यांची ‘भारतीय गणित विज्ञान’ आणि ‘मजेदार गणित’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. शिक्षकांना गणिताविषयी जागरुक करणे, विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे, समाजात आणि लोकांमध्ये गणिताची लोकप्रियता वाढवणे यासारखी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे राजोरिया यांनी यावेळी सांगितले. खगोलशास्त्रज्ञ श्री. लेले यांनी नक्षत्र खगोलशास्त्रीय दिनदर्शिकेची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

            नागपूर महानगरपालिकेच्यावतीने असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एजुकेशन (एआरटीबीएसई) यांच्या सहकार्याने झाशी राणी चौक येथील राष्ट्रभाषा भवन येथे अपूर्व विज्ञान मेळावा-२०२१ आयोजित करण्यात आला आहे. सदर अपूर्व विज्ञान मेळावा राष्ट्रभाषा भवनात १९ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहे. शहरातील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी अपूर्व विज्ञान मेळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एआरटीबीएसईचे सचिव सुरेश अग्रवाल यांनी केले आहे.

            विज्ञान मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समन्वयक राजेंद्र पुसेकर, ज्योती मेडपिलवार, नीता गडेकर, पुष्पलता गावंडे, नीलिमा आढाव, दीप्ती बिष्ट, वंदना चव्हाण, मनीषा मोगलेवार सुनीता झरबडे, प्रयत्नरत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

शुक्रवारी १००० प्लास्टिक पतंगे जप्त

Sat Dec 18 , 2021
-३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर, ता. १७ :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १७ डिसेंबर) रोजी ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. पथकाने १० झोन मधील ५५ पतंग दुकानांची तपासणी करुन १००० प्लास्टिक पतंग ५ दुकानातून धरमपेठ झोनमध्ये जप्त केली. तसेच रु. १०,०००/- चा दंड ही लावण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com