– अमरावतीतील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
अमरावती :- आदिवासी, मागास समाजाच्या उन्नतीसाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने अनेक योजना राबवून मागास परिसरात विकासाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. महाविकास आघाडीचा कमिशनखोर आमदार असला तर केंद्राच्या योजना आदिवासी, दलित, मागासांपर्यंत पोहोचणार नाहीत. केंद्र सरकारच्या योजनांचा प्रत्येक पैसा गरीब गरजूंपर्यंत पोहोचवणारा आमदार हवा असेल तर महायुतीचे उमेदवार भाजपाचे केवलराम काळे यांना सर्वाधिक मतांनी निवडून द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला व्यासपीठावर माजी खासदार नवनीत राणा, आमदार कालूसिंग ठाकूर, माजी आ. प्रभुदास भिलावेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, 2014 ते 2019 आमचे सरकार होते तेव्हा मेळघाटाच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या, अनेक विकासकामे वेगाने मार्गी लावण्यासाठी झटून काम केले. मात्र त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सर्व कामांना, स्काय वॉकच्या कामाला खीळ घालत येथला विकास रोखला. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर मेळघाटाच्या विकासासाठी ज्या ज्या मागण्या येथल्या जनतेच्या आहेत त्या सर्व पूर्ण करू असे वचन फडणवीस यांनी दिले. स्काय वॉक चे काम होते आहेच पण नेर ते खांडवा रस्ता बनवण्याचे काम, चुरनी येथे अतिरिक्त तहसील कार्यालय, केबल कार ही सर्व कामे महायुतीचे सरकार पूर्णत्वास नेईल यांची ग्वाही ही फडणवीस यांनी दिली. वनखात्याचे काही अधिकारी गोपालकांना त्रास देतात तो दूर करू, येथील दूध उत्पादक शेतक-यांना, गोपालकांना योग्य दूध दर देण्यासाठी तसेच बचत गटाच्या माध्यमातून सहकारी तत्वावरचे दूध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असेल, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार आदिवासी समाजाच्या मागे खंबीरपणे उभे आहे. देशाच्या सर्वोच्च स्थानी एका आदिवासी महिलेला विराजमान करणारे मोदी सरकार आहे. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी बिरसा मुंडा योजना, आदिवासी विद्यार्थ्यांची फी सरकार भरत आहे, केवळ आश्रमशाळाच नव्हे तर आदिवासी मुलांना निर्वाह भत्ता देखील सरकार देत आहे. आजमितीला विदेशी विद्यापीठांमध्येही आदिवासी मुले शिक्षण घेत आहेत. महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करत आहे. आमचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले की, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची रक्कम 12 हजार वरून 15 हजार रुपये करू, येत्या काळात कापूस आणि सोयाबीन पिकांना हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला दिवसा मोफत वीज देऊ असा शब्द ही फडणवीस यांनी दिला. पुन्हा एकदा जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत आलो तर माताभगीनींच्या सन्मानासाठी लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपयावर नेऊ. येत्या 3 वर्षांत राज्य़ात 1 कोटी लखपती दीदीं बनवण्याचे उद्दीष्ट आहे. हे सगळे पूर्णत्वास नेण्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे, असे त्यांनी सांगितले.
मेळघाटाशी माझे विशेष नाते – फडणवीस
माझी आजी चिखलद-याची असल्याने बालपणी येथे यायचो त्यामुळे मेळघाटाशी माझे विशेष नाते आहे. नवनीत राणा जी, आपण मेळघाटाच्या कन्या आहात तर मी येथील मुलगा आहे म्हणूनच या मागास परिसराचा विकास व्हावा असे मला मनापासून वाटते, असे भावनिक आवाहन ही त्यांनी केले.