मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’

– मनपा आणि रोटरी क्लब नागपूर ईशान्यचा संयुक्त उपक्रम : ॲलेक्सिस हॉस्पीटलचे वैद्यकीय सहकार्य

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नयेत, त्यांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी व त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जावी या हेतून मनपाद्वारे महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आलेला आहे. रोटरी क्लब नागपूर ईशान्य यांच्या सहकार्याने मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’ हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर उपक्रम मनपाच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये ॲलेक्सिस हॉस्पीटलचे वैद्यकीय सहकार्य लाभले आहे. रोटरी क्लब नागपूर ईशान्यद्वारे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’ उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आलेला होता. या सकारात्मक उपक्रमामध्ये पूर्ण सहकार्य दर्शवून मनपाद्वारे तात्काळ उपक्रमाला मंजूरी देत आवश्यक सर्व सहकार्य प्रदान केले आहे. ११ डिसेंबर २०२३ पासून नागपूर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये मनपा शिक्षणाधिकारी  साधना सयाम व रोटरी क्लब नागपूर ईशान्यचे अध्यक्ष शरद टावरी यांच्या नेतृत्वात सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जात आहे. दोन महिने हा आरोग्य तपासणी उपक्रम चालणार असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय न आणता त्यांच्या सुदृढ आरोग्याची काळजी घेणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १२७ शाळा असून या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या १४८०० एवढी आहे. मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी मुख्यत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिवरातील आहेत. या विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी, त्यांची योग्य आरोग्य तपासणी करून आवश्यकता असल्यास वेळीच वैद्यकीय उपचार मिळावे या उद्देशाने रोटरी क्लब नागपूर ईशान्यद्वारे विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची संकल्पना मांडण्यात आली. नागपूर महानगरपालिकेद्वारे आवश्यक ते सर्व सहकार्य दर्शवून विद्यार्थी आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत किंवा आरोग्याची समस्या त्यांच्या शिक्षणात अडसर ठरू नये यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’ हा महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला. ॲलेक्सिस हॉस्पीटलच्या वैद्यकीय चमूमार्फत विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी केली जाते. यासोबतच विद्यार्थ्यांचे लसीकरण, त्यांचे पोषण विषयी समुपदेश देखील केले जाते.

२० डिसेंबर २०२३ रोजी नागपूर महानगरपालिकेच्या विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थ्यांनी सादर केली चित्तथरारक प्रात्यक्षिके

Fri Dec 22 , 2023
– ब्लॅक बेल्ट परीक्षा, कराटे प्रशिक्षण – जपान येथील गुरूंच्या उपस्थितीत दीक्षाभूमीत कार्यक्रम नागपूर :- कराटेत पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांनी जपान येथील गुरूंच्या उपस्थितीत दीक्षाभूमीच्या क्रिकेट अकादमीच्या सभागृहात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. तासभर चाललेल्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांची प्रत्येक कृती पाहण्यासारखी होती. त्यांची तीक्ष्ण नजर आणि चपळता उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाला कराटेत उंच शिखर गाठलेल्या जपानच्या गुरूंची विशेष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com