मुंबई : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक हजार ८०० डॉक्टरांची पदे भरण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रूग्णालयातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही जलदगतीने करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला व बालरूग्णालयात कोविडकाळात काम करणा-या कर्मचा-यांचे वेतन आणि पदभरतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या रिक्त पदांची भरती ग्रामविकास विभागामार्फत तर ग्रामीण रूग्णालयातील पदांची भरती आरोग्य विभाग करते. या पदांची मंजुरी आणि पदभरती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेली उच्चाधिकार समिती करते. गडचिरोली जिल्ह्यात ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र संस्था मंजूर झाल्या आहेत आणि ज्यांच्या पदांना मान्यता नाही त्यासाठी पाठपुरावा करून मान्यता घेतली जाईल. वर्क ऑर्डर आणि लोकार्पणासाठी सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
गडचिरोली येथील कोविड केअर सेंटरवर काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने अदा करण्यात येणार असल्याचे सांगून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र सुरू करण्याचे निकष पूर्ण करणारे प्रस्ताव असतील तर त्याला मंजुरी देण्यात येईल, असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.