गडचिरोली :- रस्ते बांधकामावरील पकडलेल्या वाहनांवर ठोठावलेला ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी १० लाखांची लाच मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
४ जानेवारी रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. प्रमोद आनंदराव जेणेकर असे या लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव असून तो आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिली येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होता. या कारवाईने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हा कंत्राटदार असून त्याचे पेरमीली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या तुमरगुंडा ते कासमपल्लीपर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी या कामावरील वाहने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर यांनी पकडली होती. ती वाहने सोडण्यासाठी व आकारलेले ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी त्यांनी तब्बल १० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र, संबंधित तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या अनुषंगाने ४ जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला.
यात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर याला ५ लाख स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. यावेळी जेणेकर यांच्या पेरमिली येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली असता ८५ हजार रुपये रोख आढळून आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माणकीकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस अधीक्षक अनामिका मिर्झापुरे पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्यासह गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.