नागपूर, ता. १९: वीज बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या सहकार्याने तत्कालीन महापौर अनिल सोले यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या पौर्णिमा दिवसाने आज चळवळीचे स्वरूप घेतले आहे. पौर्णिमा दिवसानिमित्त मंगळवारी (ता. १८) मनपा कर्मचारी व ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (माटे चौक) चौकात वीज बचतीचे महत्व सांगून जनजागृती केली.
यावेळी माजी महापौर नंदा जिचकार, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, माजी आमदार अनिल सोले यांनी सुद्धा दुकाने व प्रतिष्ठानांतील आवश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले.
पौर्णिमा दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे रात्री ८ ते ९ असे एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. यासोबतच शहरातील एका परिसरात वीज बचतीबाबत जनजागृती करण्यात येते. मंगळवारी माटे चौकात जनजागृती करण्यात आली. या परिसरातील व्यापाऱ्यांना अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करीत ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी पौर्णिमा दिवसामागील संकल्पना समजावून सांगितली.
महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, अश्विनी डबले, साक्षी मुळेकर, तुषार देशमुख, प्रिया यादव, दीपक प्रसाद, पारस जांगडे तसेच संदेश कानोजे, भोलानाथ सहारे, विवेक गार्गे, सुधीर कपूर, रजनी शर्मा, प्रणीता लोखंडे आदिंनी व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. व्यापारी व नागरिकांनी स्वयंसेवकांच्या विनंतीला मान देत या उपक्रमात वीज दिवे बंद करून सहभाग नोंदवला. मनपाच्या वतीनेही काही पथदिवे बंद करण्यात आले होते. काही व्यापाऱ्यांनी प्रत्येक पौर्णिमेला रात्री एक तास अनावश्यक वीज दिवे बंद ठेवणार असल्याचे आश्वासन दिले.