यवतमाळ :- कारागृहातील बंद्यांना कारागृहामधून बाहेर पडल्यानंतर सन्मानपूर्वक जीवन जगता यावे. पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविता यावा, यासाठी त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्यक्षम बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यवतमाळ येथील कारागृहातील 60 बंद्यांना एलईडी लाईट दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जात असून नुकताच त्याचा शुभारंभ झाला.
प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त प. भ. जाधव, जिल्हा कारागृह अधीक्षक सुरेंद्र ठाकरे तसेच प्रशिक्षणार्थी बंदी उपस्थित होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कारागृहातच मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने यासाठी विशेष मंजुरी दिली आहे. मार्गदर्शन केंद्र, जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान आणि जिल्हा कारागृहाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण सत्र राबविल्या जात आहे.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना जाधव यांनी या प्रशिक्षणातून बंद्यांना नवीन व्यवसाय शिकता येईल आणि त्यांना समाजात पुनर्वसन करण्यास मदत होईल. कौशल्य विकासामुळे बंद्यांमध्ये आत्मनिर्भरता, स्वायत्ततेला चालना मिळते. यामुळे बंद्यांना समाजात पुन्हा सामंजस्याने एकत्र येण्यास मदत होते. कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणामुळे बंद्यांचे जीवन बदलण्याची क्षमता निर्माण होते, असे जाधव यांनी सांगितले.
कारागृह अधिक्षक ठाकरे यांनी प्रशिक्षणार्थी बंदींनी अधिक सकारात्मकतेने या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेऊन प्रशिक्षण घ्यावे. यामुळे कारागृहानंतरच्या आयुष्यात पुनर्वसन होऊन त्यांचे पुढील आयुष्य सुकर होईल, असे सांगितले. या प्रसंगी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी तसेच विशाल मानवर, प्रशांत ढेपे, प्रशिक्षक रोहन चव्हाण, दिनेश राऊत आणि कारागृहाचे जवान किशोर मानकर, माधव खैरगे उपस्थित होते.