‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर आणि स्वस्थ नागपूर’चा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिला नारा
नागपूर :- स्वच्छतेच्या संदर्भात नागपूर शहराने नेहमीच पुढाकार घेतला आहे. स्वच्छतेबाबत शहरात आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. अशात आता नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर साकारण्यासाठी ‘स्मार्ट स्वच्छता टीम’ चे गठन करण्यात आले आहे. ५०० हून अधिक सफाई कर्मचारी असणाऱ्या या स्मार्ट स्वच्छता टीमला मार्गदर्शन करताना नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी ‘स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर’ हा नारा दिला.
नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या पटांगणात बुधवार (ता. १९) रोजी सकाळी ६.३० वाजता स्वच्छता प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, अनित कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे रोहिदास राठोड, लोकेश बासनवर यांचासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वच्छ आणि सुंदर नागपूर शहर साकारण्यासाठी स्मार्ट स्वच्छता टीमचे गठन करण्यात आले आहे. मनपाच्या दहाही झोन अंतर्गत येणाऱ्या ३८ प्रभातील ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा या स्मार्ट स्वच्छता चमूमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रभागासाठी कार्यरत प्रत्येक टीम मध्ये सहा सदस्य राहतील आणि प्रत्येकी चार टीमच्या मागे एक निरीक्षक असणार आहे. ही स्वच्छता चमू नागपूर शहराला स्वच्छ करण्यासाठी आणि सुंदर स्वरूप प्रदान करण्यासाठी स्मार्टरित्या कार्य करणार आहे. या प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळेला मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मार्गदर्शन केले.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले की, मनापाद्वारे स्वच्छतेसंदर्भात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. घनकचरा संकलन, मार्ग स्वच्छ व सुंदर करणे यासाठी विविध कार्य केले जात आहेत. याशिवाय नागरिकांमध्ये स्वछतेप्रती जनजागृती व्हावी याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. याच उप्रकामांचा एक भाग म्हणून ही प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे. यात सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे, शहरातील पादचारी मार्ग स्वच्छ करताना कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे आदी बाबींवर प्रात्यक्षिक स्वरुपात मार्गदर्शन केले जात असल्याचे राम जोशी यांनी सांगितले. नागरिकांना ओला कचरा हिरव्या बॅकेट मध्ये आणि सुका कचरा नीळया बॅकेट मध्ये गोळा करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.
शहरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि योग्य पद्धतीने संकलन व्हावे, असे करताना कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी हे या कार्यशाळेचे उद्दिष्टअसल्याचे सांगत राम जोशी यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्याचा संकल्प ठेवून कार्य करण्याचे सांगितले. तत्पूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे लोकेश बासनवर यांनी कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक त्यासर्व बाबींची माहिती देत स्मार्ट स्वच्छता कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी स्मार्ट स्वच्छता टीमचे सर्व सदस्य आणि प्रत्येक झोनचे अधिकारी उपस्थित होते.