जलसंवर्धनासाठी सर्वांनी कटीबध्द व्हावे – माहिती आयुक्त राहुल पांडे

नागपूर : मानवी संस्कृतीचा विकास जलस्त्रोतांजवळ झाला असून मानवाच्या सर्वांगिण विकासामध्ये पाण्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जल साक्षरतेचे धडे सर्वांना देणे फार आवश्यक आहे. वापरात असलेल्या पाण्याचा पुनर्वापर तसेच साठा असलेल्या पाण्याच्या जपवणूकीसाठी प्रत्येकाने जल संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज येथे केले.

              जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व भारतीय जलसंसाधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जलजागृती सप्ताहनिमित्त वनामती येथे समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश पवार, अधीक्षक अभियंता उमेशचंद्र पवार, भारतीय जलसंसाधन संस्थाचे अध्यक्ष संजय वानखेडे, सचिव प्रवीण महाजन यावेळी उपस्थित होते.

मानवी संस्कृतीत पाण्याला खूप महत्वाचे स्थान असून जलस्त्रोतांजवळ संस्कृतीचा विकास झाला आहे. सर्वांनी पाण्याचे दुर्भिक्ष जाणून घेऊन आतापासूनच जलस्त्रोतांची सुरक्षा व जलसाठ्यांची जपवणूक करावी. यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्यात यावेत. पाण्याची बचत हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. पाणी वापरासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. विद्यार्थी दशेतच याची सवय लागण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात पाण्याचे महत्व हा विषय अंतर्भूत करणे आवश्यक आहे. सुमारे 350 वर्षाअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तम जलव्यवस्थापन केले असून अजूनही त्या जलस्त्रोतांत पाण्याची मुबलकता आढळून येते. त्याव्दारे प्रेरणा घेऊन नियोजनपूर्ण जलव्यवस्थापन करण्यात यावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाण्याचे संवर्धन करावे, असे श्री. पांडे यांनी सांगितले.

जलजागृती सप्ताह वर्ष 2016 पासून दि. 16 ते 22 मार्च दरम्यान राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येतो. या सप्ताहाच्या कालावधीत व्यापक प्रमाणात जलजागृती होण्यासाठी जलसंपदा व इतर विभागांव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार जलपूजन, चित्रकला स्पर्धा, जल रॅली, पाण्याचे महत्व विशद करणारे नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परंतू, जलजागृती ही केवळ सप्ताहपूर्ती मर्यादित न राहता वर्षभर पाणीबचतीसाठी सर्वसामान्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवावा. पाण्याचे संवर्धन व जलप्रदूषण रोखणे हा जलजागृती सप्ताहाचा महत्वाचा उद्देश आहे. हा उद्देश सफल होण्यासाठी भूगर्भातील आणि भूतलावरील जलस्त्रोतांचे संवर्धन तसेच जलप्रदूषण होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. ईस्त्राइलसारख्या कमी पर्जन्यमान असलेल्या देशाने पाण्याचे महत्व जाणून कमी पाण्यात जास्तीत जास्त शेती उत्पन्नासारखे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यांचा आदर्श आपणही घ्यावा, असे श्री. मोहिते यांनी सांगितले.

भारतीय जलसंसाधन संस्थाचे अध्यक्ष संजय वानखेडे, सचिव प्रवीण महाजन यांनीही जलसाठ्यांचे संरक्षण, जल बचतीचा संदेश, जलजागृतीची मोहीम, वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प याविषयी समायोचित भाषण केले.

        जलजागृती सप्ताहनिमित्त जलदूत, पाण्याच्या बचतीचे उपाय, माझ्या मनातील धरणे व कालवे, भविष्यातील पाण्याची उपलब्धता या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विभागाच्या अभियंत्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

जलजागृती विषयक राबविण्यात आलेले उपक्रम याविषयी अधीक्षक अभियंता उमेशचंद्र पवार यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. तर रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तहसील कार्यालयात शहीद दिन

Wed Mar 23 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 23:- 23 मार्च 1931 रोजी क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा 23 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com