महापौर दयाशंकर तिवारी यांचे उद्यान स्थितीच्या आढावा बैठकीत निर्देश
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासकडे असणाऱ्या मनपाच्या एकही उद्यानाची देखभाल व्यवस्थितपणे झाली नसल्यामुळे नासुप्रकडून मनपाला हस्तांतरित झालेल्या ४१ उद्यानांच्या देखभालीची निधी देऊ नका, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या उद्यान विभागाला दिले. बुधवारी (ता. १६) महापौर कार्यालयातील बैठक कक्षात नागपूर सुधार प्रन्यासकडून हस्तांतरित झालेल्या उद्यानांची स्थिती व प्रलंबित कार्याबाबत आढावा बैठक पार पडली.
बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, सदस्या रूपा रॉय, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती हरीश दिकोंडवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिपककुमार मीना, उपायुक्त रविन्द्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चोरपागार, उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरातील उद्यानांच्या देखभालीचा आढावा घेतला. तसेच नासुप्र कडून हस्तांतरित ४१ उद्यानांची स्थिती जाणून घेतली. नासुप्रने एकही उद्यानाची देखभाल व्यवस्थित केली नसल्याने त्यांना देखभालीसाठी निधी देऊ नका, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी उद्यान विभागाला दिले. तसेच यावेळी शहरातील उद्यानांची योग्य निगा व देखभाल लोकसहभागातून करण्यावर चर्चा करण्यात आली.