नागपूर,दि.17 : मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पांदण रस्ते योजनेबाबतची अंमलबजावणी करतांना नव्या शासन निर्णयाप्रमाणे कामे करण्यात यावी. राज्य शासनाचा हा पथदर्शी प्रकल्प असल्यामुळे जिल्ह्यात त्याची योग्य ती अंमलबजावणी करण्यात यावी. कोरोनामुळे अनेक कामे प्रभावी झाली आहेत. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पांदण रस्त्याबाबत पुरवणी आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश राज्याची उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
बचत भवनात झालेल्या या बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये या योजनेची समतोल अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. त्यानंतर त्यांनी पादंण रस्त्याबाबत सुटलेल्या कामांना घेऊन पुरवणी आराखडा तयार करण्याबाबतचे आदेश दिले. आजच्या बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, आमदार राजू पारवे, आशिष जयस्वाल, समीर मेघे, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पांदण रस्ते योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या मजबुतीकरण, मातीकाम याबद्दलचा आराखडा घेण्यात आला. या कामांसाठी जिल्हास्तर समिती, जिल्हा कार्यकारी समिती, तालुकास्तर समिती अशा विविध समित्या असून नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील 731 ग्राम पंचायतीसाठी क्रियान्वन यंत्रणा म्हणून जिल्हा परिषण बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत काम केले जाते.
या योजनेचे वहन करतांना मागेल त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करुन देणे, सामुहीक उत्पादक मत्ता व मुलभूत सुविधा निर्माण करुन घेणे मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ग्राम पातळीवर ग्रामसेवक, तलाठी यांनी देखील अधिक लक्ष देणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी काम सुरु असतांना लक्ष दिले जात नसल्याचे आमदार आशिष जयस्वाल यांनी लक्षात आणून दिले. या संदर्भातील शासनाचे निर्णय दिशादर्शक ठरणारे आहेत. मात्र यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष करु नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्र्यांनी या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यात अधिकाधिक काम होणे आवश्यक आहे. जे तालुके मागे पडले असतील त्या तालुक्यांच्या राहिलेल्या कामांना गतीशील करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला दाखलेकर, कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर उपस्थित होते.
खनिज प्रतिष्ठानच्या सदस्यांना कामाची माहिती द्या
यानंतर झालेल्या बैठकीत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा खनिकर्म अधिकारी गजानन कांबडे यांनी यावेळी आढावा सादर केला. जिल्ह्यात सुरु असलेले अवैध उत्खनन, रेती उपसा यासंदर्भात राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. आवश्यक त्याठिकाणी सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध झाले पाहिजे तसेच खनिज प्रतिष्ठानचा कामांना मंजूरी देताना लोकप्रतिनिधींना माहिती दिली गेली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंभोरा तिर्थक्षेत्र राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक व्हावे
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलगांना येथील भाविकांना आपले श्रद्धास्थान व पंरपरा पाळताना हे स्थळ सर्वधर्मियांसाठी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक व्हावे. पंरपरा, श्रद्धा आणि सौंदर्यीकरणाचा हा प्रकल्प आदर्श ठरावा अशा पद्धतीने याठिकाणचे नुतनीकरण करण्यात यावे. याबाबत लवकरच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात येईल. या प्रकल्पामुळे नागपूरच्या पर्यटन नकाक्षाला नवा आयाम मिळाला पाहिजे अशी सूचना आज आंभोरा तीर्थक्षेत्र संदर्भात लावण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी केले.
आंभोरा तीर्थक्षेत्र विकास करताना प्राचीन शिवमंदीर, बुद्धविहार, लेजर टुरीझम, वॉटर स्पोर्ट याकडे लक्ष वेधावे. याशिवाय पंरपरागतरित्या सुरु असलेल्या याभागातील प्रथा पाळतांना नागरीकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.
मोठा ताजबाग विकासासंदर्भात चर्चा
या बैठकीनंतर मोठा ताजबाग विकासाबाबतही विकासकासोबत चर्चा करण्यात आली. मोठा ताजबाग नुतनीकरण व सौदर्यींकरण करताना देखभाल दुरुस्ती हा विषय कळीचा मुद्दा आहे. स्थानिक ट्रस्टला विश्वासात घेऊन आवश्यक खर्च करावा. लोकोपयोगीता हा निकष ठेवून विस्तारीकरणाची भुमिका पूर्ण करायची आहे. त्यासाठी ट्रस्टसोबत बसून निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. या बैठकीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी उपस्थित होते.