– शाहीर टेंभुर्णे गुरुजी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य
रामटेक -: सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार न्यू दिल्ली व जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक व दी लॉर्ड अशोका बॅकवर्ड मल्टीपर्पज सोसायटी रामटेक तसेच शाहीर टेंभुर्णे गुरुजी सार्वजनिक वाचनालय रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने शाहीर टेंभुर्णी गुरुजी यांच्या स्मृतिदिना प्रित्यर्थ स्वातंत्र्य महोत्सवाच्या पर्वावर मेरी माटी मेरा देश अंतर्गत जत्रा लोककलेची या कार्यक्रमाचे आयोजन रामटेक येथे नुकतेच करण्यात आले.
प्रारंभी शाहीर टेंभुर्णे गुरुजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदना घेण्यात आली. शाहिरांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून मानवंदना देऊन कार्यक्रमास प्रारंभ केला. शाहीर टेंभुर्णे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर शाहिरांनी गीत व पोवाडे गाऊन त्यांच्या कार्याला उजाळा दिला. तसेच सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मेरी माटी मेरा देश ह्या कार्यक्रमांतर्गत शाहिरांनी वीर जीवनावर आधारित वीर रसातून त्यांच्या शौर्याचे वीर गाथा मांडली व देशभक्तीमय वातावरण निर्माण केले. ज्या वीर जवानांनी आपल्या देशाकरता बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळून दिले व तेच स्वातंत्र्य टिकून ठेवण्याकरता जे वीर जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता सीमेवर समर्थपणे तोंड देत आहेत अशा सर्व वीर पुत्रांना शाहीरांनी आपल्या कलेच्या माध्यमातून मानाचा मुजरा दिला व त्यांचे धैर्य वाढविले. संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या जत्रा लोककलेच्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली तर अनेक शाहीर कलावंतांनी आपली कला सादर करून जनतेचे मनोरंजनातून समाज प्रबोधन केले. प्रामुख्याने या कार्यक्रमात शाहीर रामराव वडांद्रे यांनी वंदन गीत सादर केले तर शाहीर वासुदेव आष्टनकर यांनी गौळण सादर केली. शाहीर वसंता दुंडे व शाहीर लीलाधर वडांद्रे यांनी शाहीर टेंभुर्णे गुरुजी यांच्या जीवन चरित्रावर पोवाडा सादर केला. त्याचप्रमाणे शाहीर विष्णू मेंगरे, शाहीर रामाजी राऊत, शाहीर उमाशंकर हटवार ,शाहीर नथू चनै, शाहीर फुलबांधे ,शाहीर लक्ष्मण मेंगरे, इत्यादी शाहिरांनी देशभक्तीपर गीत सादर करून लोकांची वाहवा मिळवली व जनतेने सुद्धा त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. संस्थेचे अध्यक्ष शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले अशा सर्वांचे व सर्व शाहीर कलावंतांचे आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कलावंत उपस्थित होते.