फ्लाय ॲश वापर गरज नसून संधी – आशिष जैस्वाल

-ग्रीन ॲशकॉन आणि ग्रीन बिल्डकॉन २०२१ या त्रिदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे  उदघाटन 

-उद्या  फ्लाय  ॲश  विषयक तांत्रिक सत्रांचे 

नागपूर – विनाविज विकास नाही आणि वीज म्हटलं की कोळसा आलाच. परंतु कोळसा हे जेवढे आपल्यापुढील आव्हान आहे तेवढेच त्यातून उत्पादित होणारी फ्लाय ॲश ही काळाची गरज नसून आपल्यासमोर आलेली संधी आहे. आपल्या हातून घडलेल्या प्रदूषणाला, निसर्गाकडून घेतलेल्या संसाधनाची परतफेड म्हणून हे उपउत्पादन समोर आले आहे, असे मत महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे अध्यक्ष आशिष जैस्वाल यांनी मांडले. यासाठी धोरण निर्माण होण्याची गरज असून त्यादृष्टीने तशी पावले सरकारकडून उचलण्यात यावी असे आवाहन त्यांनी केले.हरित बांधकाम साहित्य (ग्रीन बिल्डिंग मटेरियल) आणि फ्लाय ॲशचा उपयोग यावर आयोजित ग्रीन ॲशकॉन आणि ग्रीन बिल्डकॉन २०२१ च्या त्रिदिवसीय राष्ट्रीय परिषदेचा उदघाटन सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. उदघाटन समारंभाच्या वेळी ते बोलत होते.  निसर्गाचे नुकसान भरून काढणे आपल्या हातात असल्याचे ते म्हणाले. देशासाठी काही करायचे असल्यास या क्षेत्रात आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

जागतिक तापमानवाढ आगामी काळात १.५ टक्के कमी करणे अत्यावश्यक असून, वातावरणीय बदल नियंत्रणात आणणे काळाची गरज आहे. यासाठी कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणणे आणि यातून उत्पादित होणाऱ्या फ्लाय ॲशचा वापर करणे यावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधने हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन ग्रीन ॲशकॉनचे संयोजक सुधीर पालिवाल यांनी केले.
कार्बन उत्सर्जन रोखणे सहजासहजी शक्य नसले तरी त्यातून उत्पादित होणाऱ्या उप उत्पादनाचा वापर करणे आणि त्या आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदल हा चर्चासत्राचा विषय असून याबाबत सामाजिक जागरूकता आवश्यक असल्याचे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स नागपूरचे अध्यक्ष इंजि. मिलिंद पाठक यांनी केले. मानवी हस्तक्षेप याला जबाबदार असून आपणच याला रोखू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
फ्लाय ॲशबाबत सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन यावेळी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे कार्यकारी संचालक एम सिवकुमार यांनी केले. नैसर्गिक गिट्टी आणि नदीमधून काढण्यात येणारी अवैध वाळूचा पर्याय म्हणून आगामी काळात फ्लाय ॲश म्हणून पुढे येईल. सध्या देखील अनेक उद्योगांपासून तर बांधकाम क्षेत्रात देखील या उत्पादनाचा वापर सुरू झाला असून ही आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले.
 जागतिक स्तरावर देखील फ्लाय ॲश निर्यातीस मोठी मागणी आहे. औष्णिक ऊर्जा केंद्रांमधून निघणारे उप उत्पादन कायमस्वरूपी इलाज ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.फ्लाय ॲश हे सिमेंट नसले तरी सिमेंटच्या तोडीस तोड असल्याचे प्रतिपादन सतीश तंवर यांनी केले.    सिमेंट रस्ते बांधकाम आणि सिमेंट आधारित बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लाय ॲशचा वापर होत असून, अनेक देशांमध्ये या उत्पादनाचा तुटवडा आहे. भारताकडे मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असलेली फ्लाय ॲश हा भारतीय उद्योग आणि पर्यावरण क्षेत्रासाठी दिलासा असल्याचे ते म्हणाले.
चुनखडी आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर रोखणे हे आपल्यासमोरील आव्हान असून यासाठी सामाजिक जागृती होणे काळाची गरज आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून उपलब्ध असलेल्या फ्लाय ॲशचा वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दालमिया सिमेंटचे कार्यकारी संचालक सौरभ पलसानिया यांनी केले. सिमेंट उत्पादक म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या उत्पादनांमध्ये फ्लाय ॲशचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत असे ते म्हणाले.ग्रीन
ॲशकॉनचे संयोजक सुधीर पालिवाल आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स नागपूरचे अध्यक्ष इंजि. मिलिंद पाठक यांच्या अथक परिश्रमातुन साकारण्यात आलेल्या या परिषदेचा लाभ सर्व पर्यावरण प्रेमी, अभ्यासक आणि संशोधकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

फ्लाय ॲश आधारित उद्योगांनी पुढे यावे – महाजेनको
चंद्रपूर औष्णिक केंद्रांमध्ये आणि उपकेंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लाय ॲशचे उत्पादन होत असून जागतिक स्तरावर या उत्पादनाची निर्यात होत आहे. त्यामुळे देशातील आणि विदर्भातील फ्लाय ॲश आधारित उद्योगांनी पुढे यावे. आम्ही त्यांना लागेल तेवढी फ्लाय ॲश पुरवू असे आश्वासन महाजेनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे यांनी केले.

 

कार्यक्रमास दिग्गज मान्यवरांची उपस्थिती –

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे अध्यक्ष आशिष जैस्वाल, महाजेनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे,महात्मा फुले विकास प्राधिकरणाचे अधिकारी,इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स नागपूरचे अध्यक्ष इंजि. मिलिंद पाठक,दालमिया सिमेंटचे कार्यकारी संचालक सौरभ पलसानिया,वरिष्ठ अभियंता कोराडी  राजकुमार कासकर,राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे कार्यकारी संचालक एम सिवकुमार, अडाणी प्लँटच्या फ्लाय ॲश व्यवस्थापन उपाध्यक्ष सतीश तंवर, आयएएस प्रदीप चंद्रन आणि  कोराडी औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता अनिल आष्टीकर यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

 
यावेळी जैस्वाल यांच्याहस्ते कार्यक्रमादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले.
तसेच दालमिया सिमेंटचे कार्यकारी संचालक सौरभ पलसानिया यांनी फ्लाय ॲश वापरासंबंधीचे पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन सादर केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक धोरण - उद्योगमंत्री सुभाष देसाई

Fri Dec 17 , 2021
– महिंद्राच्या इलेक्ट्रिक ट्रिओ रिक्षाचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : वाढत्या इंधनदरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले. त्यानुसार राज्यात 2030 पर्यंत बहुतांश वाहने इलेक्ट्रिक वाहने असतील. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलीटीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक ट्रिओ रिक्षाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!