-आमदार निवास इमारतीचे उद्घाटन
नागपूर :- हंगामी कामगारांना खर्या अर्थाने हिवाळी अधिवेशनाची प्रतीक्षा असते. कारण महिना, दोन महिन्यांच्या कामावर त्यांच्या पुढील योजना असतात. यंदा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर हंगामी कामगारांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. जवळपास चार ते पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हंगामी कामगारांचा समावेश आहे.
हिवाळी अधिवेशन आणि हंगामी कामगार यांचा जवळचा संबंध आहे. कामगारांसाठी पोटापाण्याचा प्रश्न असतो. अनेक दशकांपासूनचा हा क्रम सुरू आहे. कधी काळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विविध संघटनांच्या माध्यमातून कामगारांची नियुक्ती व्हायची. आता खाजगीकरण झाल्याने कंत्राटदारांमार्फत कामगारांची नियुक्ती केली जाते.
विधानभवन, देवगिरी, रामगिरी, रविभवन, नागभवन, आमदार निवास, सुयोग, शासकीय निवासस्थान, 160 खोल्यांचे गाळे आदी ठिकाणची स्वच्छता, रंगरंगोटी, इलेक्ट्रिक फिटिंग, वीज, पाणी, डागडुजीसह राहण्यासंबंधी सोयी सुविधा, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, बगीचा फुलविणे त्याचप्रमाणे खुर्च्या, टेबलची स्वच्छता करणे, दुरुस्ती सर्व सामान व्यवस्थित लावणे, बंगल्यावर थांबणे, दैनंदिन कामासाठी मदत करण्यासाठी हंगामी कामगारांची नियुक्ती केली जाते. दोन आठवडे चालणार्या अधिवेशनासाठी सर्व बंगले आणि शासकीय निवाससस्थान सज्ज ठेवण्यासाठी कामाला सुरुवात झाली आहे.
यासोबतच आमदार निवास इमारत क्रमांक एक मधील 132 खोल्यांचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे उद्घाटन होईल. यासोबतच आमदारांसाठी असलेले कँटिन आणि प्रतीक्षालयाच्या नवीनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. फर्निचर नव्याने घेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. रविभवनातील स्वागत कक्षातील सभागृहाचे नूतनीकरण होणार आहे. ही सर्व कामे करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये लक्ष ठेवून आहेत.
हंगामी कामगारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू
कंत्राटदारांमार्फत हंगामी कामगारांची नियुक्ती केली जाते. कामगारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा जवळपास पाच हजार कामगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांनी सांगितले.