मुंबई :- पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र आणि क. जे. सोमैया इंस्टिट्यूट ऑफ धर्म स्टडिज यांच्या वतीने नुकतेच 6 ते 8 जुलै, 2023 या कालावधीत “महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाः पुरातत्त्व व संग्रहालयशास्त्राचे पुनरावलोकन व भविष्यातील दिशा ” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा इतिहास, समृद्ध वारसा आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयास अनुसरून ७५ परिसंवाद आयोजित करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यातील पहिला हा परिसंवाद होता.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सव्यसाची मुखर्जी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्धाटन झाले. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या परिसंवादात इतिहासपूर्वकालीन, प्रागैतिहासिक, ऐतिहासिक आणि मध्ययुगीन महाराष्ट्रासह मंदिर स्थापत्य, शिलालेख आणि नाणकशास्त्र, महाराष्ट्रातील संग्रहालये, राज्याशी संबंधित जागतिक वारसा विषय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर विद्वानांनी शोधनिबंध सादर केले. तरुण विद्वानांसाठी समर्पित एक स्वतंत्र विभाग देखील आयोजित करण्यात आला होता.
परिसंवादानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शन, फ्लिंटनॅपिंग आणि प्राचीन खेळांच्या डेमोसही छान प्रतिसाद लाभला. माजी संचालक डॉ. ए.पी.जामखेडकर यांच्या हस्ते समारोप झाला.